गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी रंगपंचमी टाळा : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 10:53 AM2020-03-13T10:53:34+5:302020-03-13T10:59:16+5:30
हुल्लडबाजी व महिलांची छेडछाड करणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करण्याकरिता स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. या सर्व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
कोल्हापूर : जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आज, शुक्रवारी साजरी होणारी रंगपंचमी गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी न करता घरगुती पद्धतीने साजरी करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केले.
देशमुख म्हणाले, सध्या जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी शक्यतो घराबाहेर न पडता तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून गर्दी न करता रंगपंचमी साजरी करण्याबाबत दक्षता घ्यावी. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या अंगावर, कपड्यांवर रंग फेकू नये व लावू नये. परीक्षा केंद्राच्या आसपास व परिसरामध्ये गर्दी, गोंगाट करून शांततेचा भंग करू नये. मोटारसायकलीच्या पुंगळ्या काढून मोटारसायकली फिरवू नयेत. परीक्षा केंद्राच्या आसपास डॉल्बी किंवा ध्वनिक्षेपक लावून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू नये.
मोटारसायकलीवरून रॅली काढून रंगांची उधळण करण्यास सक्त मज्जाव करण्यात येत आहे. रंगपंचमी खेळताना रंगामध्ये विषारी पदार्थ अथवा रसायनमिश्रित रंगांचा वापर करू नये. रंगपंचमीच्या अनुषंगाने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हुल्लडबाजी व महिलांची छेडछाड करणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करण्याकरिता स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. या सर्व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
अफवा पसरवणा-यांवर कारवाई : डॉ. अभिनव देशमुख
समाजमाध्यमांवर प्रसिद्ध वृत्तवाहिन्यांच्या नावांचा वापर करून तसेच स्क्रीन शॉटचा वापर करून कोरोनाविषयी अफवा पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे; परंतु नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाही. अशा पोस्ट कोण टाकत असल्यास तत्काळ पोलिसांकडे तक्रार द्यावी. यावर सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा अफवा पसरविणा-यांवर कडक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असा इशारा पोलीस अधीक्षक देशमुख यांनी दिला.