आवाडे जनता बॅँकेची आपत्ती काळातही उल्लेखनीय प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:39+5:302020-12-12T04:40:39+5:30
आमदार प्रकाश आवाडे (फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाचे संकट व गतवर्षीचा महापूर या नैसर्गिक आपत्तीच्या काळातही कल्लाप्पाण्णा ...
आमदार प्रकाश आवाडे
(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनाचे संकट व गतवर्षीचा महापूर या नैसर्गिक आपत्तीच्या काळातही कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बॅँकेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. बॅँकेच्या व्यवसायात वृद्धी होऊन तो ३६४० कोटींवर पोहोचला आहे. लवकरच कर्नाटकातील आणखी एक बॅँक विलीन करून घेण्यात येणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
बॅँकेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डीकेटीईमधील श्रीमंत गोविंदराव घोरपडे जहागीरदार सभागृहात ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व ४४ शाखांमध्ये ऑनलाईन पद्धतीने ही सभा झाली. सभेसाठी तीन हजार सभासद जॉईन (सहभागी) झाले होते. बॅँकेच्या अधिकारी, कर्मचारी, संचालक, सभासदांच्या योगदानातून बॅँकेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यामध्ये आठ हजार ५४० खातेदारांना ६९ लाख रुपयाचे दंड व्याज केंद्राकडून मिळाले. उद्योग उभारणीसाठी २० टक्केप्रमाणे ३७५ जणांना ५१ कोटी रुपये दिले. भागभांडवल ५८.६१ कोटींवर पोहोचले आहे. ठेवी २२१४.७२ कोटी झाल्या आहेत. बॅँकेला १५.५४ कोटी ढोबळ नफा झाला असून, खर्च वजा जाता ७.७१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २५७ जणांना लाभ दिला आहे.
चित्रदुर्ग जिल्ह्यातील हरीपूर येथील एका बॅँकेचे तीन शाखांसह लवकरच जनता बॅँकेत विलीनीकरण करणार असल्याचे यावेळी सांगितले. बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कामत यांनी नोटीस वाचन केले. यावेळी स्वप्निल आवाडे, अशोक सौंदत्तीकर, सचिन झंवर, अविनाश कांबळे, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, आदी उपस्थित होते. सरव्यवस्थापक संजय सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष चंद्रकांत चौगुले यांनी आभार मानले.
(फोटो ओळी)
१११२२०२०-आयसीएच-०४
इचलकरंजी कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार प्रकाश आवाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे, स्वप्निल आवाडे, विजय कामत, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, आदी उपस्थित होते.