आवाडे यांना प्रदेशाध्यक्षांचे निमंत्रण; मेळावा स्थगित
By admin | Published: April 21, 2016 01:04 AM2016-04-21T01:04:56+5:302016-04-21T01:04:56+5:30
संघर्षाला बुधवारी नवे वळण
इचलकरंजी : कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून पी. एन. पाटील आणि प्रकाश आवाडे यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला बुधवारी नवे वळण मिळाले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आवाडे यांना येत्या शनिवारी भेटीसाठी बोलावल्याने आवाडे गटाने शनिवारी आयोजित केलेला मेळावा स्थगित केला आहे.
काँगेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा पी. एन. पाटील यांना मुदतवाढ दिल्याने इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील आवाडे समर्थक कार्यकर्त्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे आवाडे यांनी शनिवारी (दि. २३) कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार सतेज पाटील यांनी आवाडे यांची भेट घेत भावना जाणून घेतल्या व त्या प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचविल्या. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आवाडे यांना २३ एप्रिलला भेटीसाठी बोलविले आहे. हा निरोप आल्यानंतर आवाडे यांनी काँग्रेसच्या सुकाणू समितीची बैठक घेऊन मेळावा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे लक्ष आता मुंबई भेटीकडे लागले आहे. (वार्ताहर)
कोल्हापुरात मेळावा घेणार : आवाडे
मुंबई येथे शनिवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्यानंतर स्थगित करण्यात आलेला मेळावा इचलकरंजीऐवजी कोल्हापुरात घेतला जाईल, अशी माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सायंकाळी पत्रकार बैठकीत दिली.