गायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची याचिका
By समीर देशपांडे | Published: November 10, 2022 07:58 PM2022-11-10T19:58:40+5:302022-11-10T19:58:40+5:30
३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ही अतिक्रमणे काढण्याचे उच्च न्यायालयाने दिले आदेश
समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: गायरानातील अतिक्रमणे काढण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात इचकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्यातून पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ही अतिक्रमणे काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याला स्थगिती द्यावी अशी मागणी आवाडे यांनी याचिकेत केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोंबर २२ च्या आदेशानुसार डिसेंबर अखेरपर्यंत ही अतिक्रमणे काढण्याच्या सुचना राज्य शासनाला दिल्या होत्या. ही मुदत काढून टाकावी, गायरान व सरकारी जमिनीवर केलेल्या अतिक्रमणधारकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी, ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांचे अतिक्रमण शासनातर्फे सर्वेक्षण करून नियमित करावे, अतिक्रमणधारकांच्या नावे त्याच गावामधे त्यांच्या नावे त्यांना राहण्यासाठी जमीन नाही अशा गरजू, गरीब अतिक्रमणधारकांचे प्रशासनाने वेगळा सर्वेक्षण करावे अशा मागण्या याचिकेतून करण्यात आल्या आहेत.
गेली ३० वर्षे गावठाण हद्दवाढ झाली नसल्याने राज्यात सर्वत्र अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे तात्काळ गावठाण हद्दवाढ करण्यासाठी राज्य शासनास निर्देश देण्यात याव्यात, अशीही आवाडे यांनी मागणी केली असून पुढील आठवड्यात याची सुनावणी होणार आहे.