हद्दवाढप्रश्नी तज्ज्ञांच्या समितीची प्रतीक्षा
By admin | Published: May 19, 2016 11:36 PM2016-05-19T23:36:18+5:302016-05-20T00:33:12+5:30
राज्य सरकार निर्णय घेण्यास विलंब करीत नाही ना, अशी शंका येथील जनतेच्या मनात उपस्थित होत आहे.
कोल्हापूर : शहराची हद्दवाढ करण्यासंदर्भात दोन तज्ज्ञ शासकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून त्यांच्यामार्फ त अहवाल मागवून घेतला जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले खरे; पण अद्याप अशी समितीच स्थापन झालेली नसल्याने या समितीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला परिपूर्ण अहवाल दिले असताना पुन्हा अशी समिती नेमून हद्दवाढीचा निर्णय घेण्यास विलंब करण्याचा सरकारचा हेतू आहे का, अशी शंकाही काहीजण बोलून दाखवीत आहेत. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहराला लगतची अठरा गावे आणि दोन औद्योगिक वसाहतींसह हद्दवाढ करून द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्यावर जिल्हा प्रशासनास आपला अभिप्राय देण्यास नगरविकास विभागाने सांगितले. त्याला अनुसरून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दोन औद्योगिक वसाहती वगळून हद्दवाढ करणे अपरिहार्य असल्याचा अभिप्राय दिला. एवढी सगळी प्रक्रिया पुढे गेल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वपक्षीय हद्दवाढ समितीशी चर्चा करताना हद्दवाढ कशी आणि कोणत्या मुद्द्यावर करावी, याचा अभ्यास करण्यासाठी नगरविकास विभागातील दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येईल आणि आठवड्यात ही समिती कोल्हापुरात येऊन दोन्ही बाजूंची मते जाणून घेऊन आपला अहवाल सरकारला सादर करील, असे ५ मे रोजी सांगितले होते; परंतु दोन आठवडे झाले तरी कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे आणि हे अधिकारी केव्हा कोल्हापुरात येणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. समिती केव्हा येणार, कधी मते जाणून घेणार हेच कोणाला माहीत नाही. त्यामुळे समितीच्या अहवालास विलंब लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकार निर्णय घेण्यास विलंब करीत नाही ना, अशी शंका येथील जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. समिती नेमण्यापेक्षा थेट अधिसूचना काढून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेतली असती तर बरे झाले असते, असे सर्वपक्षीय कृती समितीचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
आठवड्यात समिती येणार असे सांगितले होते; त्यामुळे आम्ही या समितीसमोर कोणी, कोणते मुद्दे मांडायचे हे निश्चित केले होेते; पण समिती नेमण्यास विलंब होत आहे. उद्या, शनिवारी याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे विचारणा करणार आहोत. - आर. के. पोवार,
अध्यक्ष, सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समिती