भाजीपाल्याचे दर अजून चढेच, पेरू, डाळिंबांचे ढीग, दरही उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:13 PM2020-08-10T17:13:07+5:302020-08-10T17:18:00+5:30
पाऊस, पूरस्थिती आणि बंद झालेली रस्ते वाहतूक यांमुळे मंदावलेली भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात सुधारली तरी दर मात्र अजूनही चढेच आहेत.
कोल्हापूर : पाऊस, पूरस्थिती आणि बंद झालेली रस्ते वाहतूक यांमुळे मंदावलेली भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात सुधारली तरी दर मात्र अजूनही चढेच आहेत. घाऊक बाजारात भाजीचा सरासरी ४० ते ५०, तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलोचा दर राहिला आहे. पुरामुळे ऐन श्रावणात भाजीपाल्याची महागाई अनुभवायला मिळत आहे.
गेल्या आठवडाभर जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे शेतातील भाजीपाला काढता येत नाही. काढला तरी तो बाजारात पोहोचविण्यासाठी रस्तेच सुरू नाहीत. नदीलगत असणाऱ्या शिवारांत तर अजून पाणी असल्याने पीक पाण्याखाली जाऊन कुजू लागले आहे. या सर्वांमुळे रविवारी बाजारात भाजीपाला खूपच कमी दिसत होता. मालच कमी आल्याने दरही वाढवण्यात आले होते.
दर किलोमध्ये
- टोमॅटो ४० ते ६०
- वांगी ६० ते ७०
- ओली मिरची ६०
- ढबू मिरची ६०
- भेंडी ५० ते ६०
- कारली ५० ते ६०
- ओला वाटाणा ८० ते १००
- दोडका ७० ते ८०
- बिनीस ६० ते ७०
- फ्लॉवर २५ ते ४० रुपये गड्डा
- कोथिंबीर १५ ते २५ रुपये पेंढी
- मेथी २० ते २५ रुपये पेंढी
- कांदा पात व पालक १० ते १५ रुपये पेंढी
ज्वारी महागली
आवक आणि मालवाहतुकीचे कारण सांगत ज्वारी आणि गव्हाचे दर वाढवण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात ४० रुपये असणारी ज्वारी आता ५० रुपयांवर गेली आहे. एक नंबर शाळू ५६ रुपये प्रतिकिलो झाला आहे. गहूही वाढला आहे. ३० ते ३२ रुपयांचा गहू आता ३५ ते ३६वर गेला आहे.
डाळिंब, सीताफळांचे ढीग
फळबाजारात सीताफळ आणि पेरूची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला आणि कोपऱ्या-कोपऱ्यांवर विक्रेते ढीग लावून ही फळे विकताना दिसत आहेत. किलोचा दर ३० ते ५० रुपये असा आहे.