प्रदर्शनातून ग्राहकांचे प्रबोधन

By admin | Published: December 24, 2014 11:53 PM2014-12-24T23:53:51+5:302014-12-25T00:01:44+5:30

राष्ट्रीय ग्राहक दिन : विविध शासकीय विभागाकडून प्रबोधनामत्क स्टॉल

Awakening of customers by display | प्रदर्शनातून ग्राहकांचे प्रबोधन

प्रदर्शनातून ग्राहकांचे प्रबोधन

Next

कोल्हापूर : दुधात भेसळ कशी होते, वजन, मापात पाप कसे होते, त्यातून ग्राहकांनी कसे सजग राहावे, आदी माहिती आज, बुधवारी ग्राहकांना मिळाली. निमित्त होते भवानी मंडप येथे भरविण्यात आलेल्या ग्राहक प्रबोधन प्रदर्शनाचे. पुरवठा विभागातर्फे भवानी मंडपात शेतकरी संघाच्या इमारतीसमोर विविध शासकीय विभागांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून प्रबोधनपर माहिती देणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष संजय बोरवाल यांच्या हस्ते झाले. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग, पुरवठा विभाग, डाक विभाग, भारतीय दूरसंचार निगम, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), एस. टी. महामंडळ, कृषी कार्यालय, आदी विभागांचा यामध्ये समावेश होता. अन्न औषध प्रशासन विभागाच्या स्टॉलमधून दुधासह विविध अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ कशी ओळखायची अशा स्पॉट टेस्टबाबत माहिती दिली जात होती; तर वजन व मापे विभागातर्फे वस्तू खरेदी करताना वजनातून ग्राहकांची लूट कशी होते, याबाबत प्रबोधन केले जात होते. प्रदर्शन पाहण्यासाठी दिवसभर ग्राहकांची गर्दी होती.
दरम्यान, शहर पुरवठा कार्यालय व करवीर तहसील कार्यालय यांच्यातर्फे प्रायव्हेट हायस्कूल येथे ग्राहक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष संजय बोरवाल उपस्थित होते. विवेक आगवणे म्हणाले, विविध मोहांना बळी पडल्याने ग्राहकांची फसवणूक होते. ती रोखणे व ग्राहक हिताचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी कायद्याचा प्रचार, प्रसार व जनजागृती होणे आवश्यक आहे.
वैधमापन विभागाचे सहायक नियंत्रक डी. पी. पोवार यांनी वैध मापन म्हणजे काय, वजन मापन पद्धती, वैधमापन कायद्याची उपयुक्तता याबाबत तर अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त एस. एम. देशमुख यांनी ‘स्वच्छ व आरोग्यदायी जीवन’ या विषयावर माहिती दिली.
यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषा देशपांडे, तहसीलदार योगेश खरमाटे, शहर पुरवठा अधिकारी दिलीप सणगर, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव, ज्योत्स्ना डासाळकर, उपस्थित होते. (प्रतिनिधी)

कोल्हापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात बोलताना मंचचे अध्यक्ष संजय बोरवाल. शेजारी डावीकडून रूपाली घाटगे, दिनेश गवळी, प्रताप जाधव, विवेक घाटगे.



९० दिवसांत तक्रार निर्णायक व्हावी
कोल्हापूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये एखादी तक्रार दाखल झाल्यानंतर ती ९० दिवसांच्या आत निर्णायक व्हावी, अशी तरतूद ग्राहक संरक्षण कायद्यात आहे; परंतु तांत्रिक कारणामुळे ग्राहकास त्याच्या तक्रारीचे प्रतिफळ मिळण्यास दिनावधी लागत असतो. त्याकरिता ग्राहक मंचानेही तत्परतेने तक्रारी निकाली करून ग्राहकांची होणारी पिळवणूक व फसवणूक थांबविली पाहिजे, अशी अपेक्षा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कंझ्युमर्स प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप जाधव यांनी आज, बुधवारी येथे बोलताना व्यक्त केली. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ कार्यक्रमात अ‍ॅड. जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक मंचाचे अध्यक्ष संजय बोरवाल होते. कार्यक्रमास ग्राहक मंचचे दिनेश गवळी, रूपाली घाटगे यांच्यासह अ‍ॅड. दंडगे, हेमंत मखरे, संतोष तावदारे, संजर डिक्रूज, प्रबंधक जे. एस. देसाई उपस्थित होते.

Web Title: Awakening of customers by display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.