स्त्रीशक्तीचा आज जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:22 AM2021-03-08T04:22:19+5:302021-03-08T04:22:19+5:30
कोल्हापूर : येथील विविध संस्था, संघटनांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आज, सोमवारी स्त्रीशक्तीचा जागर होणार आहे. सत्कार, व्याख्याने आदी ...
कोल्हापूर : येथील विविध संस्था, संघटनांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आज, सोमवारी स्त्रीशक्तीचा जागर होणार आहे. सत्कार, व्याख्याने आदी कार्यक्रम रंगणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर साध्या आणि ऑनलाइन पद्धतीने काही कार्यक्रम होणार आहेत.
काही संस्था, संघटनांकडून गेल्या आठवड्यापासून महिला दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ब्राह्मणसभा करवीर (मंगलधाम) आणि हेल्थ व्ह्यू लॅबोरेटरीच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर रविवारी घेण्यात आले. केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी ‘कोल्हापूरची महाराणी’ ही सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. कनिष्ठ अभियंता संघटनेच्यावतीने सर विश्वैश्र्वरय्या हॉलमध्ये सोमवारी सकाळी दहा वाजता व्याख्यान होणार आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे ताराबाई पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये सत्काराचा कार्यक्रम होईल. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५१ महिलांचा सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेच्या वतीने सायंकाळी ५ वाजता मार्केट यार्ड परिसरातील एका हॉटेलमध्ये गुणगौरव केला जाणार आहे. कोल्हापूर स्त्रीरोग संघटनेच्या वतीने शनिवारपासून स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञांकडून मोफत तपासणी शिबिर उपक्रम राबविण्यात येत आहे. या संघटनेचे सभासद असणारे हे तज्ज्ञ त्यांच्या रुग्णालयात प्रत्येकी पाच स्त्रियांची मोफत पॅपस्मिअर आणि ब्रेस्टची तपासणी करत आहेत. या शिबिराचा सोमवारी अखेरचा दिवस आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलांना घडविणाऱ्या महिलांचा सत्कार दि. १४ मार्च रोजी भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीकडून केला जाणार आहे. महिला मंडळे, बचत गट, संघटना, महाविद्यालयांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने महिला दिनाचे काही कार्यक्रम आयोजित केले आहेत.
चौकट
सोशल मीडियावर संदेश
सामाजिक, शैक्षणिक, कला-क्रीडा, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्वान ठरलेल्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात केलेल्या, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची यशोगाथा, त्यांच्या छायाचित्रांसह प्रेरणादायी संदेश सोशल मीडियावर रविवारपासून फिरत होते. सायंकाळनंतर त्यांचे प्रमाण वाढले.