शनिवारपासून देवीचा जागर : शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाईची विविध रूपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 08:17 PM2020-10-16T20:17:25+5:302020-10-16T20:19:47+5:30

कोल्हापूर : शनिवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची श्री महालक्ष्मी स्तोत्रानुसार विविध रूपांतील पूजा बांधण्यात येणार आहे. ...

Awakening of Goddess from Saturday: Various forms of Ambabai in Navratri festival | शनिवारपासून देवीचा जागर : शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाईची विविध रूपे

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला (शुक्रवार) कोल्हापुरात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची पंखरूपातील पूजा बांधण्यात आली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारपासून देवीचा जागर नवरात्रौत्सवात अंबाबाईची विविध रूपे

कोल्हापूर : शनिवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची श्री महालक्ष्मी स्तोत्रानुसार विविध रूपांतील पूजा बांधण्यात येणार आहे. शनिवारी पहिल्या दिवशी देवीची कुंडलिनी स्वरूपात सालंकृत पूजा होईल. दरम्यान, सकाळी नऊ वाजता तोफेच्या सलामीने मंदिरात घटस्थापना होईल.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतीन प्रमुख देवता असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्रौत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साजरा होत असला तरी देवीच्या विविध रूपांतील पूजांचे वैशिष्ट्य अबाधित आहे. महाराष्ट्रात हे एकमेव मंदिर असेल जिथे या नऊ-दहा दिवसांत देवीची विविध रूपांतील पूजा बांधली जाते. त्यामुळे भाविकांना आदिशक्तीची विविध रूपे पाहायला मिळतात. त्यामुळेच या पूजेचे मोठे आकर्षण असून, यंदा महालक्ष्मी ही देवता केंद्रस्थानी ठेवून नऊ दिवस पूजा बांधल्या जाणार आहेत.

आई अंबाबाईची रोज अशी असेल पूजा आणि साडी

  • शनिवार (दि. १७) कुंडलिनी स्वरूपात : लाल
  • रविवार (दि. १८) पराशरकृत सर्वसंशयहर श्रीमहालक्ष्म्यष्टक : पितांबरी
  • सोमवार (दि. १९) नागकृत महालक्ष्मी स्तवन : केशरी
  • मंगळवार (दि. २०) सनत्कुमार महालक्ष्मी सहस्रनाम : निळा, जांभळा
  • बुधवार(दि. २१) गजारूढ अंबारीतील पूजा : लाल
  • गुरुवार (दि. २२) श्रीशिवकृत महालक्ष्मी स्तुती : पांढरा
  • शुक्रवार (दि, २३) अगस्त्यकृत सरस्वती स्तवन : पिवळा
  • शनिवार (दि. २४) : महिषासुरमर्दिनी : लाल
  • रविवार (दि. २५) : अश्वारूढ : कोणत्याही रंगाची
  •  
  • दहा ठिकाणी एलईडी स्क्रीन


यंदा कोरोनामुळे अंबाबाई मंदिर बंद असल्याने भाविकांना अंबाबाईचे लाईव्ह दर्शन घडावे यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने शहरात दहा ठिकाणी मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. ती ठिकाणे : बिनखांबी गणेश मंदिर, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, क्रशर चौक, शिवाजी चौक, उभा मारुती चौक, राजारामपुरी जनता बझार चौक, व्हीनस कॉर्नर, ताराराणी चौक, कसबा बावड्यातील भगवा चौक.

अंबाबाईचे लाईव्ह दर्शन कसे घ्याल..

सध्या कोरोनामुळे अंबाबाई मंदिर बंद असले तरी नागरिक देवीचे ऑनलाईन दर्शन घेवू शकतात. गुगल प्ले अथवा प्ले स्टोअरवरून अंबाबाई लाईव्ह दर्शन हे ॲप डाऊनलोड केले की देवीची मुर्तीच भाविकांना दिसेल.

Web Title: Awakening of Goddess from Saturday: Various forms of Ambabai in Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.