जागरुक खेळाडू नूरमहंमद देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2017 01:02 AM2017-02-04T01:02:35+5:302017-02-04T01:02:35+5:30

नूरमहंमदने मुंबई संघावर केलेले आक्रमण धुळ्यातील प्रेक्षकांनी नावाजले

Awakening player Noormahmedad Desai | जागरुक खेळाडू नूरमहंमद देसाई

जागरुक खेळाडू नूरमहंमद देसाई

Next

नूरमहंमद देसाई याने फुटबॉलबरोबरच हॉकी व रग्बी खेळातही आपली छाप पाडली आहे. प्रॅक्टिस या बलाढ्य संघाकडून खेळणाऱ्या नूरने महाराष्ट्र पोलिस संघाला अनेक स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवून दिले आहे. मैदानावरील भांडणांपासून दूर राहणारा नूर सध्या स्थानिक संघाला मार्गदर्शन करतो.
नूरमहंमद माणिकराव देसाई याचा जन्म १२ सप्टेंबर १९६१ला झाला. नूरमहंमदचे प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या शाळा नं. ८ मध्ये झाले. शिवाजी पेठेत वास्तव्य असल्यामुळे सभोवतालच्या फुटबॉलमय वातावरणाचा त्याला फायदा झाला. शाळा नं. ८ कडून त्याने वयाच्या दहाव्या वर्षांपासून लहान मुलांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावयास सुरुवात केली. त्याच शााळेतील हौशी शिक्षक धोंडिराम पाडळकर यांच्या प्रोत्साहनासह मार्गदर्शनामुळे नूरमहंमद लहान मुलांच्या फुटबॉल स्पर्र्धांमध्ये खेळू लागला. प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर नेहमी ४ फूट ११ इंच मापाच्या स्पर्धा होत असत. या सामन्यात नूरमहंमद खेळू लागला. याकाळी तो बॅक, फॉरवर्ड व हाफ या जागांवर संघाच्या गरजेप्रमाणे खेळू लागला आणि इथेच त्याने फुटबॉलचे प्राथमिक धडे गिरविण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्र हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर वणिरे सर यांनी आपल्या शालेय संघात दाखल करून घेतले. शााळेच्या ११ खेळाडूंमध्ये त्याला स्थान मिळाले. सन १९७६ साली धुळे येथे झालेल्या राज्य शालेय फुटबॉल स्पर्धेत तो खेळला. महाराष्ट्र हायस्कूलने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यात त्यांचा पराभव झाला असला तरी या सामन्यातील नूरमहंमद आणि राईट आऊट भाऊ सरनाईक यांचे कॉम्बिनेशन अप्रतिम होते. नूरमहंमदने मुंबई संघावर केलेले आक्रमण धुळ्यातील प्रेक्षकांनी नावाजले. शालेय स्तरावरच नूर खेळाडू म्हणून तयार झाला. फुटबॉल खेळत असतानाच नूरमहंमदने शाळेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.
नूरमहंमदने कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथेही कॉलेजच्या संघात त्याची निवड होऊन कॉलेज स्पर्धांही गाजविल्या. डाव्या पायावरून उजव्या पायावर पळता पळता बॉल घेऊन लो-ड्राईव्ह या हार्डर घणाघाती किकच्या साहाय्याने विरुद्ध संघाचे गोलपोस्ट भेदण्याची त्याची हातोटी मस्त. कॉमर्स कॉलेजकडून खेळताना शिवाजी विद्यापीठाच्या झोन, इंटर झोन सामन्यातील उत्कृष्ट खेळामुळे वेस्ट झोनकरिता त्याची विद्यापीठ संघात निवड झाली. गोवा, झाशी, भोपाळ या ठिकाणी कधी स्टॉपर, कधी लेफ्ट आऊट, तर कधी फॉरवर्ड या जागांवर खेळून कॉलेज जीवनातील फुटबॉल खेळाचा आनंद मनमुराद उपभोगला. नूरमहंमद हॉकीही उत्तम खेळत असल्याने कॉलेजच्या हॉकी संघात वेस्ट झोनसाठी त्याची निवड झाली होती.
कॉलेजमध्ये खेळत असतानाच कोल्हापुरातील बलाढ्य प्रॅक्टिस संघाने नूरमहंमदला आपल्या संघात सामावून घेतले. होणाऱ्या सर्व स्थानिक संघांमध्ये नूरमहंमदने मैदान मारलेच; पण बाहेरगावच्या सांगली, मिरज, गडहिंग्लज येथे खेळून नूरने प्रॅक्टिस क्लबची शान वाढविली. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच कोल्हापूर पोलिस संघ बाळसे धरत होता. तत्कालीन पोलिसप्रमुखांनी त्यास कोल्हापूर पोलिसमध्ये भरती करून घेतले. यामुळे त्यास कायमची नोकरी मिळाली. त्यामुळे भारतात विविध शहरात खेळावयास मिळाले.
कोल्हापूर पोलिस संघाकडून खेळताना उठावदार खेळामुळे नूरमहंमद यास १९८४ ते १९९२ पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या पोलिस संघात खेळण्याची दीर्घकाळ संधी मिळाली. एस. के. मुसा, भारतीय संघातील माजी खेळाडू कृष्णन यांच्या तंत्रशुद्ध मार्गदर्शनाखाली त्याने सराव केला. या संघातून त्याला जयपूर, अमरावती, कोलकाता, मुंबई येथेही कोल्हापुरी फुटबॉलचे उत्तम प्रदर्शन करता आले. त्याचबरोबर त्याने रग्बी फुटबॉल स्पर्धेतही सहभाग घेतला आहे. इंडिया साऊथ एशिया कप रग्बी स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली होती. सेव्हन-अ-साईड फुटबॉलमध्ये महाराष्ट्र पोलिस संघास प्रथम क्रमांक मिळवून देण्याचा नूरचा सिंंहाचा वाटा होता. एकदा पुणे येथे पोलिस संघातून खेळताना सुदान स्टुडंटस् या संघावर २० व्या मिनिटांत नूरने गोल केला व सुदानी स्टुडंटस् संघाने नूरच्या संघावर चार गोल केले. ही निराशाजनक आठवण त्यास बराच काळ सलत होती. नूरमहंमद शांत स्वभावाचा. खेळात त्याचा कधी संयम सुटला नाही. क्रीडांगणावर होणाऱ्या मारामाऱ्यापासून सदैव दूर. नूरमहंमद कोल्हापूर शहरात पोलिस खात्यात कार्यरत असून, स्थानिक संघास तो मार्गदर्शन करतो.
(उद्याच्या अंकात : सूर्यकांत ऊर्फ बाबू पाटील)


प्रा. डॉ. अभिजित वणिरे

Web Title: Awakening player Noormahmedad Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.