उत्तूरच्या विकासाला पुरस्कारांची पोच
By admin | Published: May 9, 2017 12:30 AM2017-05-09T00:30:12+5:302017-05-09T00:30:12+5:30
तालुका, जिल्हा, राज्य पुरस्कार प्राप्त : विकासात पदाधिकारी, सेवाभावी संस्था, विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षकांचे योगदान
रवींद्र येसादे । -लोकमत न्यूज नेटवर्क
उत्तूर : आजरा तालुक्यातील उत्तूर हे २२ खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असणारे गाव. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या गावाने सन २००९ ते २०१७ पर्यंत १२ पुरस्कार तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर मिळविले आहेत. पुरस्कारांतून गावचा विकास ही उत्तूर गावची ओळख झाली आहे.
राज्य सरकारची गौरव गावसभा ही योजना गावाने राबवून गौरव सभेचा पुरस्कार २०१० मध्ये तालुका, जिल्हास्तरावर मिळविला. तेव्हापासून पुरस्कार मिळविणे हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर न ठेवता गावचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. यातूनच पुरस्कार मिळू लागले.
शासनाच्या पुरस्कार प्राप्तीसाठी असणाऱ्या नियम, अटींचे पालन करून गावच्या विकासात पदाधिकारी, सेवाभावी संस्था, शाळकरी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.
शैक्षणिकदृष्ट्या अगे्रसर असणारे गाव असूनही प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी राज्यस्तरावर चमकले आहेत. सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्ड्यांचे नियोजन, स्पर्धात्मक मार्गदर्शनाखाली गं्रथालय उपलब्ध आहेत. आदी सर्व घटकांची पाहणी पथकाकडून केली जाते.
गावच्या विकासाच्या दृष्टीने योजनांची प्रभावीपणे मांडणी करून गावास अधिकाधिक पुरस्कार मिळवून देऊन पुरस्कारांतून थेट शासनाच्या निधीतून विकासासाठी निधी ग्रामपंचायतीला मिळविण्यासाठी प्रयत्न केले. सात वर्षे उत्तम काम करण्याची संधी उत्तुरातील सर्व गटातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे ग्रामपंचायतीचे मनोबल उंचावले आहे.
- राजेंद्र नुल्ले,
ग्रामविकास अधिकारी.
पुरस्कारप्राप्त सरपंच
नवी दिल्ली येथे माजी सरपंच रमेश ढोणुक्षे यांनी निर्मलग्राम पुरस्कार स्वीकारला.
पर्यावरण तज्ज्ञ पुरस्कार, यशवंत राज्य पुरस्कार २०१४-१५, यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार २०१४-१५ माजी सरपंच सुप्रिया पाटील यांनी स्वीकारला.
यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार २०१५-१६, यशवंत सरपंच पुरस्कार माजी सरपंच वनिता ढोणुक्षे यांनी स्वीकारला.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम योजना पुरस्कार सरपंच हर्षदा खोराटे यांनी स्वीकारला.
जिल्ह्यातील पहिली आयएसओ २०१५ मानांकन असणारी ग्रामपंचायत आहे. कॅशलेस प्रणाली वापरून १ लाख ८४ हजार रुपये कर जमा करण्यात आला आहे.
आॅनलाईन दाखले, एस. टी. आरक्षण, एस.एम.एस.द्वारे गावसभा संदेश, १०० टक्के करवसुली, दारूबंदी असणारे गाव, हागणदारीमुक्त गाव, प्रत्येक घरात नळाचे कनेक्शन, प्रत्येक घरात एलईडी बल्ब, स्ट्रीट लाईटसाठी एल.ई.डी. बल्बचा वापर, २४६२१ झाडांपैकी १४२५२ झाडे गावाने जगविली आहेत.
ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी, लिपिक ते कर्मचारी यांनी योग्यप्रकारे नियोजन केल्याने यश मिळाले. जि. प. सदस्य उमेश आपटे यांच्या फंडातून कचरा उठावासाठी ट्रॅक्टर-ट्रॉली, मिनी कचरा उठाव मशीन व तीनचाकी व चारचाकी वाहन देण्यात आले.
या वाहनातून दररोज कचरा गोळा करून धामणे पठारावरील गायरानात कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. दररोजच्या कचरा उठावासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश आपटे यांच्या फंडातून डस्टबिन दिली आहे. कचरागाडी रोज गावात फिरत असल्याने ओला व सुका कचरा गाडीत टाकला जातो.