corona virus-गाण्याच्या माध्यमातून शिक्षकाची ‘कोरोना’साठी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 02:32 PM2020-03-19T14:32:34+5:302020-03-19T14:36:46+5:30
कोल्हापूरातील विक्रमनगर येथील न्यू श्री सिध्देश्वर प्राथमिक विद्यालयातील शिक्षक राजेंद्र कोरे यांनी स्वत: गाणे लिहून त्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती केली. या गाण्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरु आहे.
प्रदीप शिंदे
कोल्हापूर : कोल्हापूरातील विक्रमनगर येथील न्यू श्री सिध्देश्वर प्राथमिक विद्यालयातील शिक्षक राजेंद्र कोरे यांनी स्वत: गाणे लिहून त्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती केली. या गाण्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरु आहे.
राजेंद्र कोरे हे विक्रमनगर येथील न्यू श्री सिध्देश्वर प्राथमिक विद्यालयातील शिक्षक आहेत. त्यांना गाण्याची आवड आहे. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनाला मदत व्हावी या उद्देशाने त्यांनी स्वत: हे गाणे तयार करून ते लोकप्रिय गाण्याच्या चालीवर गायिलेही आहे.
https://youtu.be/Iyum3sefH9A
युट्यूबवर त्यांनी कोरोनाबाबत जागृती करण्याबाबतचा व्हिडिओ प्रसारित केला असून सोशल मिडियावर बराच व्हायरल होतो आहे. कोरोना आजाराला घाबरून न जाता नेमक्या उपाययोजना काय केल्या पाहिजेत याबद्दल सहज-सोप्या शब्दांचा वापर करून रचलेल्या या गाण्याच्या माध्यमातून कोरे यांनी कोरोना हे गाणे तयार केले आहे. यातून कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी आणि उपाय योजना सुचविल्या आहेत.
राजेंद्र कोरे यांनी यापूर्वीही महापुराचा आपत्तीदरम्यान प्रत्यक्ष मदत कार्य करण्याबरोबरच नागरिकांनी महापुरामध्ये घ्यावयाची काळजीबाबत ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून प्रसार केला होता. सध्या त्यांचे हे गाणे फेसबुक, युट्यूब आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल झालेले आहे. लोकांचा त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहेत.
एवढी काळजी तुम्ही घ्या...
कराओके ट्रॅकवरील संगीताचा वापर करून त्यांनी ‘नको गर्दीत जाऊ, थोडासा प्रवास टाळू, खोकताना, शिंकताना नाकावर रुमाल ठेवू, येवढी काळजी तुम्ही घ्या, कराना कराना हे करा ना, पळवून लावू हा कोरोना’हे गीत शब्दबद्ध करून लयीत रेकॉर्ड केले आहे.
सध्या शाळा- कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे मुले सोशल मिडियावर जास्त अॅक्टीव्ह आहेत. त्यांच्यापर्यंत सोशल मिडियाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी मी हा प्रयत्न केला आहे.
- राजेंद्र कोरे,
शिक्षक, न्यू श्री सिध्देश्वर प्राथमिक विद्यालय, विक्रमनगर.