आवळी एमआयडीसीच्या भूसंपादनास वेग, कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग विस्तारणार
By पोपट केशव पवार | Published: December 3, 2024 05:39 PM2024-12-03T17:39:10+5:302024-12-03T17:39:47+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव व पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील जागा संपल्याने उद्योगांचा विस्तार कसा करायचा, असा प्रश्न उद्योजकांसमोर आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव व पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील जागा संपल्याने उद्योगांचा विस्तार कसा करायचा, असा प्रश्न उद्योजकांसमोर आहे. गेल्या काही वर्षांतील ही समस्या लक्षात आल्यानंतर तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विकासवाडी, आवळी, कौलव, अकिवाट या ठिकाणी नव्या एमआयडीसींची घोषणा केली होती. गेल्या पाच वर्षांत या प्रस्तावित एमआयडीसींचे काय झाले, त्यांची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे याचा आढावा घेणारी ही मालिका आजपासून..
पोपट पवार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतींमधील उद्योग विस्ताराला चालना देण्यासाठी आवळी (ता. पन्हाळा) येथे २५२ हेक्टरवर उभारण्यात येणाऱ्या एमआयडीसीच्या प्रक्रियेला विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा वेग आला आहे. या एमआयडीसीच्या भूसंपादनाची अधिसूचना निघाली असून, येत्या वर्षभरात भूसंपादन करण्याचे नियोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाने केले आहे. या एमआयडीसीमुळे शाहूवाडीसह पन्हाळा तालुक्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्धी होणार आहे.
शाहूवाडी तालुक्यातील डोनोळी व पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे एमआयडीसी उभारण्यासाठी राज्य सरकारच्या उद्योग विभागाने एप्रिल २०२३ मध्ये तत्त्वत: मान्यता दिली होती. या जागांची भू-निवड समितीने पाहणीही केली होती. यात आवळी येथील २५२ हेक्टर क्षेत्राच्या प्रस्तावाला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिल्यानंतर ३० ऑगस्ट २०२४ ला आवळी येथील एमआयडीसीसाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली. येत्या वर्षभरात हे भूसंपादन करून पुढील पूर्ण प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाने सुरू केले आहे.
नव्या महामार्गामुळे याला महत्व
रत्नागिरी-नागपूर हा महामार्ग याच एमआयडीसीजवळून गेला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या उद्योजकांना उत्पादनाच्या वाहतुकीसाठीची कटकट थांबणार आहे. जिल्ह्यात सध्या उद्योगाच्या विस्तारीकरणाला जागाच नसल्याने नव्या एमआयडीसीची गरज होती. ही एमआयडीसी वर्षभरात पुर्णत्वास जाणार असल्याने उद्योग विस्तारण्यासाठी आवळीचा पर्याय अनेकजण स्वीकारु शकतात.
डोंगराळ भागात रोजगाराच्या संधी
शाहूवाडी तालुक्यातील डोंगराळ भागातील अनेक तरुण सध्या पुण्या-मुंबईला तुटपुंज्या वेतनावर काम करतात. शिवाय या मतदारसंघातील काही तरुण शिरोली, गोकुळ शिरगाव या एमआयडीसींमध्ये कामाला आहेत. आवळी येथे एमआयडीसी झाल्यानंतर नोकरीसाठी दूर गेलेल्यांना घरापासून जवळ काम मिळणार आहे. त्यामुळे हे तरुण परत गावाकडे येऊ शकतात.
दृष्टिक्षेपात आवळी एमआयडीसी
- मान्यता : एप्रिल २०२३
- क्षेत्र : २५२ हेक्टर.
आवळी येथे २५२ हेक्टरवर एमआयडीसी उभी केली जाणार आहे. याची प्रक्रिया पूर्णत्वास गेली असून, वर्षभरात भूसंपादन करून पुढील कार्यवाही करण्याचे नियोजन आहे. - उमेश देशमुख, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, कोल्हापूर
उद्योगांबाबत सरकारचे चांगले धोरण असल्याने प्रत्येकाला एमआयडीसीमध्येच उद्योग उभा करायचा आहे. त्यामुळे विस्तारीकरण व नवीन उद्योगांना जागा देण्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशावेळी आवळी येथील एमआयडीसी या उद्योजकांसाठी लाभदायी ठरणार आहे. -सुरेंद्र जैन, अध्यक्ष, स्मॅक, शिरोली