प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘आयुष गार्डन’ : अमन मित्तल, सेवा रुग्णालयाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 05:56 PM2019-01-29T17:56:43+5:302019-01-29T17:58:38+5:30
‘आयुष गार्डन’ हा सेवा रुग्णालयातील स्तुत्य उपक्रम असून जिल्ह्यातील ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रात हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.
कोल्हापूर : ‘आयुष गार्डन’ हा सेवा रुग्णालयातील स्तुत्य उपक्रम असून जिल्ह्यातील ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रात हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.
लाईन बझार येथील सेवा रुग्णालयातील आयुष निदान व उपचार शिबिराचा प्रारंभ मंगळवारी मित्तल यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा वेदक, सेवा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उमेश कदम उपस्थित होते.
अमन मित्तल म्हणाले, सेवा रुग्णालयातील ‘आयुष गार्डन’मध्ये वृक्षांची नावे लिहून त्या वृक्षाच्या औषधी महत्त्वाची माहिती लिहिली आहे. त्यामुळे या वनस्पतींचा नागरिकांत प्रचार व प्रसार होईल.
आयुर्वेदामुळे रोग होण्यापूर्वीच प्राथमिक काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे भविष्यात ‘आयुष’ या विषयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. सेवा रुग्णालयात पंचकर्म सुविधा सुरू व्हावी, या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे सांगून मित्तल म्हणाले की, सेवा रुग्णालयात योग शिबिरे आयोजित करण्याचा प्रयत्न व्हावा. ‘आयुष’ उपचाराकडे नागरिकांचा ओढा वाढत असून, या उपक्रमाचा अधिक प्रसार होण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्नशील राहावे.
जिल्हा आयुष अधिकारी दादा सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास ‘आयुष’च्या डॉ. सारिका पाटील, डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. सुलेखा साळोखे, डॉ. दीपाली देसाई, डॉ. अशपाक मुजावर, डॉ. प्रताप नाळे, डॉ. बी. एस. थोरात, डॉ. दिलीप वाडकर, डॉ. सुदर्शन पाटील, डॉ. राघवेंद्र पोटे, डॉ. डी. जी. तांबिरे, डॉ. चंद्रकांत माने यांच्यासह अनेक मान्यवर तसेच नागरिक, महिला आणि रुग्ण उपस्थित होते.