आजरा कारखाना आजी-माजी संचालकांचा ऊस बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:59 PM2017-12-17T23:59:44+5:302017-12-18T00:02:33+5:30
कृष्णा सावंत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : आजरा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस माजी संचालकांसह काही विद्यमान संचालकही बाहेरच्या कारखान्याला पाठवित आहेत. कारखाना टिकविण्याची जबाबदारी आजी-माजी सर्वच संचालकांवर असताना संचालकच ऊस बाहेर पाठवित असल्याने शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था आहे.
चालू हंगामात सर्वच कारखान्यांना तोडणीच्या अपुºया यंत्रणेची अडचण येत आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांकडे तोडणीची पुरेशी यंत्रणा नसल्याने ऊस गाळपास जाण्यास विलंब होत आहे. त्याचप्रमाणे cआजरा कारखान्यातही चालू हंगामात अपुरी यंत्रणा आहे. त्यामुळे भागातील ऊस उचलणे जिकिरीचे बनले आहे. तरीदेखील भागातील उसाला प्राधान्य देण्याची गरज आहे.
ज्या संचालकांनी कारखान्याच्या जिवावर अनेक वर्षे सत्ता उपभोगली, ऐश्वर्य पाहिले तेच आजी-माजी संचालक कारखान्याला आधार देण्याची गरज असताना बाहेरील कारखान्यांना ऊस देऊन घरचा संसार मोडण्यास हातभार लावत आहेत. कारखाना प्रशासनात काही त्रुटी असल्यास त्या दाखवून देऊन सुधारण्याची संधी देणे अपेक्षित आहे. मात्र, बाहेरील कारखान्याला ऊस देऊन डाव मोडकळीस आणण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे.
प्रशासनात काही चुका वाटत असल्या तरी शेतकºयांची बिले वेळेवर जमा होत आहेत. केवळ राजकारणासाठी अन्य कारखान्यांना प्राधान्य देणे व्यर्थ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. चुकीच्या कारभाराविरोधात प्रहार करण्यास रान मोकळे आहे. मात्र, बाहेर ऊस देऊन आपल्याच पायावर दगड मारून घेतल्यासारखे आहे.
हेवेदावे बाजूला ठेवण्याची गरज
विभागातील सहकारी तत्त्वावरील एकमेव कारखाना आहे. तो टिकविण्यासाठी आजी-माजी सर्वच संचालकांनी एकत्र बसून कारखाना टिकविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
संचालक पदापुरता आपला कारखाना
आजरा कारखाना सहकारी तत्त्वावरील विभागातील एकमेव कारखाना आहे. खासगी कारखान्यांना ऊस घालणाºयांचे हाल वाईट होणार आहेत. त्यामुळे संचालकापुरता आपला कारखाना म्हणणे ही मानसिकता चुकीची असून हक्काचा कारखाना अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.
प्रशासनाकडून प्रबोधनाची गरज
कारखान्याला ऊस पाठविण्यासाठी सभासदांमध्ये जाऊन प्रशासनाकडून प्रबोधन होताना दिसत नाही. टोळ्या नसल्याने उत्पादक सेंटरचे दरवाजे झिजवत आहेत. पर्यायाने त्यांना अन्य कारखान्यांना ऊस द्यावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनानेही सभासदांपर्यंत जाऊन आजºयालाच ऊस देण्यासाठी आवाहन करण्याची काळाची गरज आहे.