भ. आदिनाथांच्या मूर्तीवर मस्तकाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 01:17 AM2018-05-07T01:17:57+5:302018-05-07T01:17:57+5:30

B Mastakabhishek on the idol of Adinath | भ. आदिनाथांच्या मूर्तीवर मस्तकाभिषेक

भ. आदिनाथांच्या मूर्तीवर मस्तकाभिषेक

Next


कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील महास्वामी लक्ष्मीसेन जैन मठातील श्री १००८ भगवान आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी बृहन्मूर्तीवर रविवारी सायंकाळी ५७वा वार्षिक महामस्तकाभिषेक करण्यात आला. भक्तिपूर्ण वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला. भ. चंद्रप्रभू तीर्थकरांचा पंचामृत अभिषेक व महाशांतिमंत्राचे पठण करण्यात आले. सकाळी सहा वाजता मंगलवाद्य घोष आणि ध्वजारोहण करण्यात आले.
भट्टारकरत्न पट्टाचार्य स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी यांच्या अधिपत्याखाली आणि मुडबिद्री (कर्नाटक) येथील भट्टारक पट्टाचार्य जगद्गुरू स्वस्तिश्री डॉ. चारूकीर्ती महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी महामस्तकाभिषेक करण्यात आला. यावेळी पंचामृत अभिषेक, दुग्धाभिषेक, इक्षुरसाभिषेक, कलकचूर्ण, कुंकुमाभिषेक, कशायद्रव्य, हळदाभिषेक, सर्वौषधी, चतुष्कोन, अष्टगंध, पुष्पावृष्टी, शांतिकलश असा महामस्तकाभिषेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जैन सेवा संघाने महाआरती केली. पंडित राजू उपाध्ये, शशिकांत उपाध्ये आणि प्रशांत उपाध्ये यांनी पौरोहित्य केले. याप्रसंगी अभयकुमार इंगळे, रूपाली पाटील, राजेंद्र मकोटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय कोठावळे, विद्याधर चौगुले, सतीश पत्रावळे, भरत वणकुद्रे, अभय भिवटे, अजित सांगावे, कोल्हापूर, मुंबई, पुणे, कर्नाटकातील श्रावक उपस्थित होते.
ज्ञान मिळविण्यासह संयमाची गरज :
चारुकीर्ती महास्वामी
क्रोध, लोभ, माया, मत्सर हे नष्ट करण्यासाठी कोणत्याही शस्त्राची नाही, तर संयमाची गरज आहे. विविध स्वरूपांतील ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. जैन समाजाच्या तत्त्वप्रणालीप्रमाणे समाजाने आचरण करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन मुडबिद्री (कर्नाटक) येथील जगद्गुरू स्वस्तिश्री डॉ. चारूकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी रविवारी येथे केले.
येथील शुक्रवार पेठेतील महास्वामी श्री लक्ष्मीसेन जैन मठातर्फे आयोजित ‘आदर्श दाम्पत्य’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. जैन भवनमधील या कार्यक्रमास स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात अ‍ॅड. कुुंतीनाथ आणि प्रा. कांचनताई कापसे यांना स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या हस्ते ‘आदर्श दाम्पत्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, दुपट्टा, हार, शास्त्र, मानपत्र आणि ११ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी म्हणाले, अ‍ॅड. कापसे यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे कार्य हे प्रेरणादायी ठरणारे आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ सामुदायिक ‘णमोकार’ महामंत्राने झाला. कोलकाता येथील पारसकुमार आणि गुणमाला पांड्या यांचा विशेष सन्मान प्रा. डी. ए. पाटील आणि विमलाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट यांचा सत्कार प्रा. कांचनताई कापसे यांच्या हस्ते झाला. दिगंबर जैन बोर्डिंगचे अध्यक्ष सुरेश रोटे यांनी स्वागत केले. प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. पी. आर. पाटील यांनी कापसे दाम्पत्याचा परिचय करून दिला. प्रा. गोमटेश पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय मगदूम यांनी आभार मानले.

Web Title: B Mastakabhishek on the idol of Adinath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.