शिवाजी विद्यापीठाकडून बी. ए., बी. कॉम.सह १५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:59 AM2020-08-21T11:59:22+5:302020-08-21T12:02:31+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी बी. ए., बी. कॉम, बी. एस्सी., आदी विविध १५ अभ्यासक्रमांचे निकाल ऑनलाईन जाहीर झाले. मागील सत्राच्या गुणांच्या सरासरीवर गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रथम आणि द्वितीय सत्राच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना मागील सत्रातील गुणांच्या सरासरीवर गुण देऊन निकाल लावण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कार्यवाही करून निकाल जाहीर करण्यात येत आहे.
विद्यापीठाकडून आता विविध १७१ अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात गुरुवारपासून झाली. निकाल जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यासह द्वितीय आणि तृतीय वर्षाची प्रलंबित राहिलेल्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे.