बी-टेन्युअरची प्रकरणे प्रांतांकडे जाणार
By admin | Published: August 6, 2016 12:07 AM2016-08-06T00:07:52+5:302016-08-06T00:17:42+5:30
अजित पवार यांची माहिती : ‘लोकमत’चा सातत्याने पाठपुरावा
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील बी-टेन्यूअरची ४०० हून अधिक प्रकरणे संबंधित टेबलवरील लिपिकाअभावी रखडली होती. याप्रश्नी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी ही प्रकरणे येत्या दहा दिवसांत प्रांताधिकारी
यांच्याकडे हस्तांतरित केली जातील, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘इनाम जमिनी’च्या नोंदी किंवा ‘ब’ सत्ता प्रकरणात चुकीचा शेरा मारल्यामुळे मिळकतपत्रावर काहींना बँकांमध्ये कर्जे मिळत नाहीत; तर काहींना आपल्या पाल्यांना परदेशी पाठविण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळत नाही. त्यामुळे या नोंदी योग्य आहेत की नाही, याची निर्गत करण्याचे अधिकार प्रांत किंवा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. जून २०१६ पर्यंत या प्रकरणातील नागरिकांना योग्य ती सेवा या कार्यालयाकडून मिळत होती. मात्र, ४ जून २०१६ रोजी या कार्यालयातील संबंधित टेबलावरील लिपिकाची बदली अन्यत्र करण्यात आली. प्रशासनाने ही बदली या जागेवर त्याला तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे केली. बदलीमुळे रिक्त जागी अन्य लिपिक त्या जागी रूजूही झाला. मात्र, त्याला हे काम दिले गेले नाही. विशेष म्हणजे जुन्याच लिपिकासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी हेका धरला आहे; तर ‘या टेबलावर अन्य कुठलाही लिपिकाने काम केले पाहिजे. मी त्या ठिकाणी दुसरा लिपिक देणार नाही,’ असे प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले होते तरीही ही प्रकरणे दोन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित होती. याबाबत ‘लोकमत ने वृत्तही दिले होते. त्याची दखल घेत अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी गुरुवारी येत्या दहा दिवसांत सर्व प्रकरणे प्रांताधिकारी यांच्याकडे हस्तांतरित केली जातील, असे सांगितले.
येत्या दहा दिवसांत बी-टेन्युअरची प्रकरणे प्रांतांकडे हस्तांतरित करू. त्यातून सर्व प्रकरणांची निर्गत केली जाईल. यासंबंधीचे निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कार्यवाही तत्काळ केली जाईल.
- अजित पवार,
अप्पर जिल्हाधिकारी
बी-टेन्युअरची निर्गत न केल्याने माझ्यासह अनेकांना हे मिळकतपत्र सादर करता येत नाही. त्यामुळे याबाबतची निर्गत त्वरित करावी. या प्रकरणांची निर्गत त्वरित न लागल्यास महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेच दाद मागण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे.
- सुधीर राणे, नागरिक