‘बालकल्याण’मधील तीन मुलींसाठी चारशे मुले प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 06:48 PM2017-07-29T18:48:22+5:302017-07-29T18:57:31+5:30

baalakalayaanamadhaila-taina-maulainsaathai-caarasae-maulae-parataikasaeta | ‘बालकल्याण’मधील तीन मुलींसाठी चारशे मुले प्रतीक्षेत

‘बालकल्याण’मधील तीन मुलींसाठी चारशे मुले प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देदिवसाला सरासरी दहा विवाहोच्छुक मुलांचे अर्ज दाखलसंस्थेतील बावीस मुलींपैकी केवळ तीन मुली सध्या विवाहासाठी तयारमुलीच्या अपेक्षा आणि शासकीय नियमांच्या कसोटीतून पडावे लागते पार७0 मुलींचे संसार सुखाचेखर्च संस्था आणि देणगीदारांतर्फेयांचे सासरे असतात थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक!





इंदुमती गणेश

कोल्हापूर, दि. २९ : मुलामुलींच्या संख्येतील व्यस्त प्रमाण, वधूसह पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा यांमुळे सध्या मुलांचे विवाह होणे हीच मोठी समस्या बनली आहे. परिणामी कोल्हापुरातील बालकल्याण संकुलातील मुलींशी विवाह करण्यासाठी इच्छुक असलेल्या जवळपास चारशे मुलांचे अर्ज आजच्या घडीला संस्थेत दाखल आहेत. दुसरीकडे, संस्थेतील बावीस मुलींपैकी केवळ तीन मुली सध्या विवाहासाठी तयार असून, त्यांच्याशी विवाह करणे म्हणजे ‘येरागबाळ्याचे काम नोहे...’ अशी स्थिती आहे.

मुलगा-मुलगी भेदातून समाजात मुलींची संख्या कमी आहे. त्यात मुली शिकलेल्या असल्याने त्यांच्या व पालकांच्याही वराकडून मोठ्या अपेक्षा असल्याने अनेक कुटुंबांकडून अनाथाश्रमात वाढलेल्या मुलींना विवाहासाठी प्राधान्य दिले जात आहे.

संस्थेत वाढलेल्या मुलींच्या फार अपेक्षा नसतात, असा एक गैरसमज आहे. मात्र अनाथ मुलामुलींचे हक्काचे घर म्हणून काम करणाºया आणि त्यांना मायेची ऊब देणाºया मंगळवार पेठेतील ‘बालकल्याण संकुला’मधील मुलीशी विवाह करणाºया वराला आणि कुटुंबाला मुलीच्या अपेक्षा आणि शासकीय नियमांच्या कसोटीतून पार पडावे लागते.

संस्थेत सध्या अगदी जन्मलेल्या बाळापासून ते अठरा वर्षांपर्यंतची दोनशेएक मुले-मुली राहतात. अठरा वयापुढील मुलींसाठी आधारगृह चालविले जाते. सध्या येथे अठरा ते बावीस वयोगटातील २२ मुली आहेत. त्यांपैकी १९ मुली वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत; तर तीन मुलींचे शिक्षण पूर्ण झाले असून, त्यांनी विवाहासाठी तयारी दर्शविली आहे. या तीन मुलींना जवळपास ४०० अर्जांतून आपल्यासाठी सुयोग्य वराची निवड करावी लागणार आहे.

साधारणत: १९८५ साली संस्थेतील पहिल्या मुलीचे लग्न झाले आणि सध्या ७० मुली त्यांच्या घरी सुखाने संसार करीत आहेत. संस्थेतील किमान तीन-चार मुलींचे वर्षाला विवाह होतात. त्यांचा सगळा खर्च संस्था आणि देणगीदारांतर्फे केला जातो. संस्थेतील मुलींशी विवाह करू इच्छिणाºया जवळपास दहा ते बारा मुलांचे अर्ज दिवसाला संस्थेकडे येतात. त्यामुळे त्यांच्याशी विवाह होणे हीदेखील साधी-सोपी बाब राहिलेली नाही.

अशी होते वराची निवड...

मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संस्थेच्या खूप महत्त्वाच्या अटी आहेत. मुलाने निर्व्यसनी असले पाहिजे, कुटुंब सुशिक्षित व अनाथ मुलीचा मनापासून स्वीकार करणारे असले पाहिजे, स्वत:चे चांगले घर हवे, नोकरी सरकारी किंवा खासगी असली तरी चांगला पगार हवा, शेती असेल तर उत्तमच; किंवा आणखी काही संपत्ती असणे अपेक्षित आहे. या अपेक्षेनुसार आलेल्या अर्जांमधून मुलीसाठी योग्य ठरू शकतील अशा पाच-सहा मुलांचे अर्ज मुलीला दिले जातात. त्यातून मुलगी एक-दोन स्थळांची निवड करते. त्यानंतर संबंधित कुटुंबाला हे कळवून मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो. दोघांकडून होकार आला की मुलीसोबत संस्थेचे पदाधिकारी जाऊन मुलाचे घर, परिसर, गाव बघून येतात. त्याला मुलीकडून होकार आला तरच पुढची बोलणी होतात. मुलगा-मुलगीची आरोग्य तपासणी करून तिचा अहवाल, मुलाच्या संपत्तीची कागदपत्रे, मुलाचे व आई-वडिलांचे संमतीपत्र व विवाहाचा प्रस्ताव महिला व बालकल्याण विभागाला पाठविला जातो. त्यांच्या शंकांचे निरसन झाले की विवाहाला मान्यता मिळून संस्थेत थाटात लग्न लावून दिले जाते.

माहेरवाशिणीचे सुख...

लहानपणापासून बालकल्याण संकुल या संस्थेत वाढलेल्या मुलींसाठी ते माहेरघरच असते. मुलीचे थाटात लग्न लावून दिले तरी संस्थेची जबाबदारी संपत नाही. ती सासरी सुखी आहे का, हे पाहण्यासाठी पदाधिकारी तिच्या घरी जातात. मुलीचे पहिले बाळंतपणही संस्थेद्वारे केले जाते. बाळ-बाळंतिणीला पाठविताना आहेर, शिदोरी दिली जाते. सणावाराला, संस्थेतील मुलीच्या विवाहाला आवर्जून निमंत्रण पाठविले जाते. आठवण आली की मुलगी संस्थेत येऊन दोन दिवस मैत्रिणींसोबत मजेत राहून पुन्हा सासरी जाते.


सासरे थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक!

जिल्हाधिकारी हे बालकल्याण संकुलाचे पदसिद्ध अध्यक्ष आणि पोलीस उपअधीक्षक हे कार्याध्यक्ष आहेत. अनेकदा त्यांच्या वतीने मुलीचे कन्यादान केले जाते; त्यामुळे संस्थेतील मुलींशी विवाह झालेल्या तरुणांचे सासरे म्हणजे थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारीच असल्याने त्यांच्यावर नैतिक दबाव असतो. त्यामुळे संंस्थेतून विवाह होऊन गेलेली मुलगी सासरच्या त्रासामुळे परत आली, वाद-तंटे झाले किंवा घटस्फोट झाला, अशी एकही घटना आजवर घडलेली नाही.
--------------
ही संस्था म्हणजे मुलींचे माहेरच आहे. मुलगी विवाहयोग्य वयाची झाली की तिला स्वयंपाकापासून ते आर्थिक व्यवहार, संसार चालविण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी शिकविल्या जातात. या मुलींना स्वत:च्या हक्काचे घर आणि मायेची माणसं मिळाली. त्यांच्या संसारात त्या सुखी आहेत, ही गोष्ट आम्हाला समाधान देणारी आहे.
- पद्मजा तिवले (मानद कार्यवाह, बालकल्याण संकुल)

Web Title: baalakalayaanamadhaila-taina-maulainsaathai-caarasae-maulae-parataikasaeta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.