‘कलगीतुऱ्या’नंतर बाबा-दादा एकत्र!
By Admin | Published: July 25, 2014 10:00 PM2014-07-25T22:00:23+5:302014-07-25T22:14:54+5:30
राजकीय वर्तुळाचे लक्ष : कऱ्हाडात उद्या यशवंतरावांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण
प्रमोद सुकरे - कऱ्हाड
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार कऱ्हाड दौऱ्यावर आले; पण त्यांनी कार्यक्रम मात्र स्वतंत्र केले. त्याची चर्चा सुरू असतानाच रविवारी, दि. २७ रोजी ते दोघेही पुन्हा कऱ्हाड दौऱ्यावर येत आहेत. पण या दौऱ्यात त्या दोघांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची ‘गणगौळण’ राज्यभर सुरू आहे. आघाडी सरकारमधील काँग्रेस-राष्ट्रवादीत जागा वाटपावरून तणातणी सुरू आहे. १४४ जागांसाठी राष्ट्रवादीची ‘दादा’गिरी सुरू आहे. राष्ट्रवादीचा ‘अल्टिमेटम’ काँग्रेसने धुडकावला आहे. स्वतंत्र लढण्याची भाषा करणाऱ्या पुतण्याचे कान काकांनी यापूर्वीच टोचले आहेत. त्यामुळे रविवारी कऱ्हाडच्या कार्यक्रमात बाबा-दादा एकत्र आल्यावर काय-काय घडामोडी होणार याकडे लक्ष लागले आहे.
येथील शेती उत्पन्न बाजार समितीत कऱ्हाड तालुका महाआघाडीची सत्ता आहे. आमदार बाळासाहेब पाटील या आघाडीचे अध्यक्ष आहेत तर आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले आदी नेते त्याचे सदस्य आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात बसविलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी अनेक मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. दोन्ही काँग्रेसमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे.
राज्यात दोन्ही काँग्रेस एकत्रित लढणार असे गृहीत धरले जाते, तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कऱ्हाड दक्षिणमधून लढण्याचे संकेत दिले आहेत. आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादीकडून उत्तरेतून निश्चित मानले जातात. या पार्श्वभूमीवरही कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणाला दिशादर्शक म्हणूनच या कार्यक्रमाकडे पाहिले जातेय. कऱ्हाड दक्षिण-उत्तर विधानसभा मतदारसंघ परस्परांना विविध कारणांनी जोडले असल्याने त्यांचा एकमेकांवर प्रभाव आणि परिणाम होऊ शकतो.
यशवंतरावांची राजकीय संस्कृती घेणार ?
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळख आहे. म्हणून तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या स्मारकाजवळ आत्मक्लेष (?) केला होता! पण आता यशवंतरावांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे कऱ्हाडातील स्थानिक नेते त्यांच्याकडून राजकारणातला सुसंस्कृतपणा घेतील आणि नजीकच्या काळात त्याचे आचरण करतील, अशी आशा अनेकजण बाळगून आहेत.
अतुल भोसलेंचे नाव पत्रिकेतून गायब
गेल्या आठवड्यापर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रत्येक कार्यक्रमात डॉ. सुरेश भोसले किंवा डॉ. अतुल भोसले यांचे नाव निमंत्रणपत्रिकेवर दिसत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या गेल्या दोन दौऱ्यांकडे भोसलेंनी पाठ फिरवल्याने रविवारच्या दौऱ्यात भोसलेंचे निमंत्रणपत्रिकेवरील नाव गायब झालंय.
असा आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा
रविवारी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ९ वाजता कऱ्हाड विमानतळावर येणार आहेत. तेथून सुपने येथे कोयना नदीवरील नवीन पुलाचे भूमिपूजन, सकाळी १० वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन, ११ वाजता शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण, दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृह तर सायंकाळी ५ ते रात्री ९ सवादे येथे उंडाळे परिसरातील कार्यकर्त्यांशी संवाद.