बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा लोकोत्सव : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:45 AM2018-03-27T00:45:42+5:302018-03-27T00:45:42+5:30
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव यंदा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांच्या गाण्यांचा ‘भीमवंदना’ हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आकर्षक चित्ररथ तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आणि संवेदना सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिलला जयंतीदिनी जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोेजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, ‘गोकुळ’चे संचालकबाबा देसाई, ‘रिपाइं’(ए)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, भाजपचे महानगरजिल्हाध्यक्ष संदीप देसाई, ‘रिपाइं’ (गवई गट)चे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख, ‘रिपाइं’ (कवाडे गट)चे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, लोकजन शक्ती पक्षाचे बाळासाहेब भोसले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, आंबेडकर जयंती भव्य दिव्य स्वरूपात आणि रचनात्मक पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला असून, यंदाच्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर आधारित ‘भीमवंदना’ हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. यासाठी ४ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता शिवाजी स्टेडियमवर प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांच्या गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रेकॉर्ड केला जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका वितरित केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण १४ एप्रिलला संपूर्ण देशभर प्रक्षेपित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा जिल्हावासीयांनी लाभ घ्यावा.
या बैठकीत आंबेडकर यांची जयंती भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्याबाबत उत्सव कमिटीचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी विविध सूचना केल्या. यावेळी सुभाष देसाई, अनंत खासबागदार, डी. के. कांबळे, रघुनाथ मांढरे, आदी मान्यवर
उपस्थित होते.
जिल्हाभर चित्ररथ फिरणार
डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य आणि आकर्षक चित्ररथही तयार करण्यात येणार असून हा चित्ररथ जिल्ह्यातील बहुतांशी गावांत फिरविला जाणार आहे. या रथाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर आधारित गीते तसेच त्यांच्या विचारांचा संदेश गावागावांत पोहोचविला जाणार आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
शाहू-आंबेडकर स्मारकासंदर्भात तोडगा काढू
डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्या शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या जागेवर राजर्र्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्याबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून सर्वसमावेशक तोडगा काढला जाईल, तसेच स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली.