बाबा, घरी केव्हा येणार?
By Admin | Published: May 28, 2017 12:55 AM2017-05-28T00:55:10+5:302017-05-28T00:55:10+5:30
पित्याला पाल्याचा प्रश्न : बंदीजन-मुलांच्या गळाभेटीने कळंबा कारागृह गहिवरले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बाबा, मला तुमची खूपच आठवण येते. तुम्ही घरी केव्हा येणार? आई घरी नेहमी रडत आपली वाट पाहत आहे... लहान मुलांच्या या प्रश्नामुळे कारागृहातील वातावरण भावुक झाले होते, तर पाल्याने विचारलेल्या या प्रश्नावर बंदीजन पूर्णपणे निरुत्तर होत होते. निरुत्तर झालेल्या बंदीजन पित्याची अवस्था पाहून मुलांचे नयन अश्रूंनी डबडबले... असे गहिवरलेले वातावरण शनिवारी सकाळी कळंबा कारागृहात अनुभवण्यास मिळाले.
कारागृह प्रशासनाच्या पुढाकाराने शिक्षाबंदी आणि त्यांच्या मुलांची गळाभेट शनिवारी घडवून आणली अन् नेहमी सुन्न असणारे कळंबा कारागृहातील वातावरण गहिवरून गेले. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दीर्घकालीन शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांसाठी हा उपक्रम आयोजित केला. २१२ पुरुष आणि आठ महिला बंदीजनांनी या उपक्रमासाठी नावनोंदणी केली होती. सकाळी आठ वाजल्यापासून सुमारे ४१८ मुलांना घेऊन बंद्यांचे नातेवाईक कारागृहाबाहेर थांबून होते. सकाळी साडेदहा वाजता या गळाभेटीला प्रारंभ झाला. प्रथम दोन वर्षे वयाच्या मुलासोबत एका पालकाला आत सोडण्यात आले. त्यानंतर २ ते १६ वयोगटातील मुलांना फक्त एकट्यालाच भेटण्यासाठी आत सोडण्यात आले.
पाल्य कारागृहात गेल्यानंतर हातातील ओळखपत्र घेऊन ते आपल्या आईबाबांना शोधण्याचा प्रयत्न करीत होते; तर दुसरीकडे मुलांच्या गर्दीतून बंदीजनांच्या नजरा आपल्या मुलाला शोधताना प्रखरतेने जाणवत होत्या. मुलाचे नाव पुकारल्यानंतर बंदीजन धावत-पळत मंडपात येऊन आपल्या पाल्याला घट्ट मिठी मारून त्याला उचलून त्याचे प्रेमाने पापे घेत होते. अनेक बंदीजन हातामधील पिशवीतील खाऊ व बाटलीतील सरबत आपल्या हाताने मुलांना भरवीत होते. गेले अनेक दिवस आपल्यापासून दुरावलेल्या पित्याकडून मिळणारे प्रेम पाहून मुलांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. मुलांची अवस्था पाहून हताश झालेल्या बंदीजनांना हुंदका आवरत नव्हता. नुकताच शाळेतील निकाल लागल्याने अनेक मुलांनी आपल्या शाळेतील निकालच सोबत आणून आपल्या बंदीजन पित्याला दाखवून त्यांच्याकडून शाबासकी मिळविली. ‘तुम्ही शिकून मोठे व्हा, आईची काळजी घ्या,’ असा सल्लाही यावेळी बंदीजनांकडून पाल्याला दिला जात होता. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कारागृह अधीक्षक शरद शेळके, वरिष्ठ तुरुंगाधिकारी चंद्रकांत आवळे, एस. एल. आडे, तुरुंगाधिकारी यू. एन. गायकवाड, सतीश गायकवाड, रवींद्र रावे, प्रकाशसिंह परदेशी, मीरा बाबर, शिक्षक सुभाष मोहिते यांनी परिश्रम घेतले.
नजरा शोधिती...
पाल्य कारागृहात गेल्यानंतर ते भांबावलेल्या स्वरूपात दिसत होते. हातातील ओळखपत्र घेऊन त्याची नजर आपल्या पित्याला शोधताना दिसत होती. हीच परिस्थिती बंदीजन पित्यांची होती. पाल्यांच्या गर्दीतून ‘त्या’ला शोधण्यासाठी त्यांच्या नजरा भिरभिरत होत्या. मुलाचे नाव पुकारल्यानंतर बंदीजन धावतच मंडपात येऊन आपल्या मुलाची गळाभेट घेत होते.
साध्या गणवेशात भेट : या गळाभेटीत मुलांनी बंदीजनांना नव्हे, तर आपल्या पित्याला भेटल्याचा आनंद घ्यावा, यासाठी बंदीजनांना साध्या गणवेशात भेटण्याची मुभा प्रशासनाने दिली होती.
घास भरविण्याचा आनंद
कारागृह प्रशासनाने बंदीजनांसह त्यांच्या मुलांच्या भोजनाची सोय केली होती. त्यामुळे बहुतांश बंदीजनांनी आपल्या मुलांसोबत एकाच ताटात भोजन घेतले. प्रत्येकाने आपल्या पाल्याला हाताने घास भरविण्याचा आनंद घेतला.