इचलकरंजी पालिकेतील लाचखोर शाखा अभियंता बबन खोत निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 06:07 PM2021-11-24T18:07:10+5:302021-11-24T18:07:26+5:30
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या नगररचना विभागातील शाखा अभियंता बबन कृष्णाजी खोत व त्याचा पंटर किरणकुमार विलास कोकाटे यांना वीस ...
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या नगररचना विभागातील शाखा अभियंता बबन कृष्णाजी खोत व त्याचा पंटर किरणकुमार विलास कोकाटे यांना वीस हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने १६ नोव्हेंबरला रंगेहात पकडले होते. याप्रकरणी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी बबन खोत याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत माहिती अशी की, जमिनीचे गुंठेवारी पोटविभागणीच्या प्रलंबित फाईलवर मुख्याधिकाºयांची सही घेवून देतो, असे सांगून तक्रारदाराकडे बबन खोत याने लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदारकडून लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने १६ नोव्हेंबरला दोघांना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी लाचलुचपत विभागाने कारवाई करत चौकशी सुरू केली होती.
चौकशीअंती लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी खोत याला महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियम १९७९, महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडील १२ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसार निलंबित करावे, असा आदेश मुख्याधिकाऱ्यांना संदेशाद्वारे दिला आहे. त्यानुसार मुख्याधिकाºयांनी निलंबनाची कारवाई केली. निलंबनाच्या या कारवाईनंतर पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.