बदलला पक्ष तरी आमदारकी फिक्स; कोल्हापूर जिल्ह्यात सहा जणांना मिळाले यश
By पोपट केशव पवार | Published: October 25, 2024 07:10 PM2024-10-25T19:10:08+5:302024-10-25T19:14:04+5:30
पोपट पवार कोल्हापूर : उमेदवारापेक्षा पक्ष कोणता हे पाहून अनेक मतदार आपला कौल ठरवत असतात. त्यामुळे उमेदवारांनी इकडून तिकडे ...
पोपट पवार
कोल्हापूर : उमेदवारापेक्षा पक्ष कोणता हे पाहून अनेक मतदार आपला कौल ठरवत असतात. त्यामुळे उमेदवारांनी इकडून तिकडे उड्या मारणे अनेकांना रुचत नाही. निकालात याची प्रचिती राज्यात बहुतांश मतदारसंघांत दिसते. काही मतदारसंघ मात्र याला अपवाद आहेत. उमेदवाराने निवडणुकीत पक्ष बदलल्यानंतरही कोल्हापूर जिल्ह्यातील सहा उमेदवारांनी गुलाल घेतला आहे. बाबासाहेब कुपेकर, दिग्विजय खानविलकर, सदाशिवराव मंडलिक, अमल महाडिक, उल्हास पाटील यांनी पक्ष बदलूनही जनतेने त्यांना दुसऱ्या पक्षातून उभे राहिल्यानंतर विधानसभेत पाठवले आहे.
खानविलकर यांना राष्ट्रवादीतून यश
दिग्विजय खानविलकर हे १९८०, ८५, ९० व ९५ असे चारवेळा काँग्रेसमधून आमदार होते. शरद पवार यांचे ते जवळचे निकटवर्तीय. १९९९ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुढे १९९९ला त्यांनी राष्ट्रवादीतून विजय प्राप्त केला.
‘हात’ सोडून घड्याळावरही कुपेकरांची जादू
गडहिंग्लजमधून १९९५ला काँग्रेसच्या चिन्हावर विधानसभेत गेलेले बाबासाहेब कुपेकर यांनी १९९९ला राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधत निवडणूक लढवली. पक्ष बदलूनही गडहिंग्लजकरांनी त्यांना गुलाल लावला.
सदाशिव मंडलिक यांचा करिष्मा
कागल मतदारसंघातून १९७२ला अपक्ष विजय मिळवलेल्या सदाशिवराव मंडलिक यांनी १९८५ मध्ये एस काँग्रेसकडून विधानसभा गाठली. पुढे १९९० व १९९५ला त्यांनी काँग्रेस आयमधून विजय मिळवला. विशेष म्हणजे काँग्रेसला रामराम करत ते १९९९ व २००४ला राष्ट्रवादीकडून लोकसभेत गेले. पुढे २००९ला अपक्ष विजय मिळवत त्यांनी पक्षापेक्षा स्वत:चाच करिष्मा असल्याचे सिद्ध केले होते.
ऐनवेळी भगवा घेत उल्हास पाटील यांचा विजय
शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कार्यरत असणाऱ्या उल्हास पाटील यांनी २०१४ मध्ये निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश करत विजय मिळवला होता. स्वाभिमानीचा झेंडा सोडून ऐनवेळी भगवा खांद्यावर घेत त्यांनी मिळवलेला विजय पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चिला गेला.
अमल महाडिक यांचा विजय
अमल महाडिक हे २०१४च्या निवडणुकीआधी काँग्रेसकडून भादोले (ता. हातकणंगले) जिल्हा परिषदेचे सदस्य होते. निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून विजयश्री प्राप्त केली.
कोरे, पाटील यांची बाजी
चंदगडमूधन १९९०ला काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत गेलेले नरसिंग पाटील हे १९९९ला राष्ट्रवादीकडून तर २००४ला ‘जनसुराज्य’कडून लढले व विजयी झाले. १९९९ला राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून पन्हाळा मतदारसंघातून विजयी झालेले विनय कोरे पुढे २००४ला स्वत:च्या जनसुराज्यकडून आमदार झाले.