बाबूराव धारवाडे यांचे निधन
By Admin | Published: June 2, 2017 01:01 AM2017-06-02T01:01:28+5:302017-06-02T01:01:28+5:30
बाबूराव धारवाडे यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकीय-सामाजिक चळवळींचा मागील पन्नास वर्षांचा चालता-बोलता इतिहास असणारे, शाहू विचारांवर नि:स्सीम श्रद्धा असणारे माजी आमदार बाबूराव आबासाहेब धारवाडे (वय ८८, रा. आयडियल सोसायटी, सागरमाळ, कोल्हापूर) यांचे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन
झाले.
त्यांच्या निधनाने एक सच्चा शाहूभक्त हरपल्याची भावना व्यक्त झाली. त्यांच्या पश्चात मुलगा उदय, चार विवाहित मुली व सून असा परिवार आहे. त्यांच्यावर आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मूत्र संसर्गामुळे गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्यांना शास्त्रीनगरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. आज रात्री आठच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांनी द्रवरूप जेवण घेतले, तसेच औषधे घेतली. झोपेतच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तातडीने त्यांना शास्त्रीनगरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव आधार हॉस्पिटलमधील शवागरात ठेवण्यात आले आहे. विद्यार्थीदशेपासून स्वातंत्र्य चळवळीत काम करणाऱ्या धारवाडे यांनी जनसेना संघटना काढून कोल्हापूर शहरातील नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतला होता. कोल्हापूरसारख्या डाव्या पक्षांचा प्रभाव असलेल्या जिल्"ांत त्यांनी काँग्रेसचा विचार रूजविण्याचे काम केले. जिल्हा काँग्रेसचे ते सन १९६१ मध्ये सलग अकरा वर्षे अध्यक्ष होते. पुढे १९८५ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांचा ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार या मातब्बर नेत्यांशी अत्यंत जवळचा संबंध आला. यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील या दिग्गजांना एकत्र आणण्याचाही प्रयत्न त्यांनी केला होता. ते नुसते हाडाचे कार्यकर्ते, नेतेच नव्हते तर क्रियाशील विचारवंत व पत्रकारही होते. अनेक वर्षे ते ‘जनसारथी’ साप्ताहिक चालवत होते. राजकारणातून बाजूला झाल्यावर त्यांनी पूर्णवेळ शाहू कार्याला वाहून घेतले. कोल्हापुरातील शाहू स्मारकची उभारणी हे त्याचे मूर्तीमंत प्रतीक. जिल्"ांतील साखर कारखान्यांकडून निधी गोळा करून त्यांनी या संस्थेची उभारणी केली. शाहू जयंतीचे औचित्य साधून प्रतिवर्षी शाहू व्याख्यानमाला व शाहू महाराजांच्या नावे दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा ‘शाहू पुरस्कार’ही त्यांच्याच पुढाकाराने सुरू झाला. त्यांचा स्वत:चाही या पुरस्काराने सन्मान झाला होता.
दिल्लीत संसदेच्या समोर व मुंबईत विधान भवनाच्या समोर शाहूंचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना तोड नाही. किंबहुना त्यालाच त्यांनी जीवितकार्य मानले. कोल्हापूर गॅझेटियरमध्ये आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यावर त्याविरोधात त्यांनी रान उठविले व हा मजकूर सरकारला बदलण्यास भाग पाडले. त्यांच्यावर जसा शाहू विचारांचा प्रभाव होता, तसाच त्यांच्यावर माधवराव बागल यांच्या विचारांचाही पगडा होता. तेच त्यांचे स्फूर्तिस्थान होते. धारवाडे यांनी पुढाकार घेऊन शाहू मिल चौकात बागल यांचा पुतळा उभारला व शाहूपुरीत त्यांच्या नावाने विद्यापीठ सुरू केले.