बांबवडेत आरोग्य केंद्रास टाळे
By admin | Published: June 16, 2015 12:58 AM2015-06-16T00:58:21+5:302015-06-16T01:16:08+5:30
वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी : ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमावा या मागणीसाठी बांबवडे ग्रामस्थांच्यावतीने कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर रास्ता रोको करून आरोग्य केंद्रास टाळे ठोकण्यात आले. यानंतर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विजय नांद्रेकर यांच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको स्थगित करून आरोग्य केंद्राचे टाळे काढण्यात आले.
शाहूवाडी तालुक्यातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या बांबवडे येथील आरोग्य केंद्रात दररोज १०० ते १२५ रुग्णांची तपासणी होते. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी पुढील शिक्षणासाठी गेल्याने आठवड्यापासून येथे डॉक्टर नाहीत. यानंतर लगेच दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली. तेही मेडिकल रजेवर गेले. पुन्हा सरूड वैद्यकीय केंद्राच्या अधिकाऱ्याकडे दोन्ही केंद्राचा पदभार दिला. अशा परिस्थितीमुळे येथील रुग्णांची गैरसोय होत आहे.
यामुळे सरपंच विष्णु यादव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणेला निवेदन देऊन डॉक्टरांची मागणी केली. मागणी योग्यरित्या मान्य न झाल्याने सोमवारी ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रास टाळे ठोकून रास्ता रोको आंदोलन केले. वैद्यकीय विभागाने याची बराच वेळ दखल न घेतल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी संयमाने परिस्थिती नियंत्रणात आणली.
सरपंच यादव यांच्यासह ग्रामस्थांनी जोपर्यंत कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी या केंद्रास मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली. यानंतर
डॉ. विजय नाडेकर यांनी येऊन
डॉ. भंडारी यांची मंगळवारी (दि. १६) पासून प्रतिनियुक्तीवर नेमणूक करत असल्याचे व तालुका वैद्यकीय अधिकारी रजेवरून परत येताच कायमस्वरूपी डॉक्टर नेमण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले व ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात पंचायत समिती सभापती पंडितराव नलवडे, उपसरपंच गजानन निकम, रवींद्र फाटक, महादेव पाटील-आवळकर, चंद्रप्रकाश पाटील व ग्रामस्थ सहभागी झाले होते.