पोफळीत आईनेच केला मुलाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:49 AM2018-09-19T00:49:47+5:302018-09-19T00:49:50+5:30
शिरगाव (चिपळूण) : संशयास्पद मृत्यू झालेल्या पोफळी येथील तरुणाला त्याच्या आईनेच मारले असल्याची खळबळजनक बाब मंगळवारी उघड झाली आहे. विक्रांत राजाराम पवार (वय २३) असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याची आई राजश्री पवार (५२) हिला अटक केली आहे. सलग तीन वर्षे आपल्याला आणि मुलीला होणाऱ्या मारहाणीला कंटाळून आपण विक्रांतला मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची कबुली तिने दिली आहे. चिपळूण तालुक्यातील पोफळी पवारवाडी येथे हा प्रकार घडला आहे. मुंबईत ठेकेदाराकडे काम करणारा विक्रांत गणपतीला गावात आला. सोमवारी (दि. १७) सकाळी विक्रांत पवार याचा त्याच्या घरातच मृतदेह आढळला. त्याच्या शरीरावरील खुणांमुळे त्याचा मृत्यू संशयास्पद होता. तो रविवारी (दि. १६) रात्री १२ वाजता घरी आल्याचे व आपण अपघातात जखमी झाल्याचे त्याने सांगितले, असा जवाब त्याची आई राजश्री व घरातील मंडळींनी दिला. त्याच्या डाव्या डोळ्यावर ताजी जखम व मारहाणीचे व्रण दिसत होते. त्यामुळे पोलिसांना शंका होती. मृतदेहाचे विच्छेदन सुरू असतानाच पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या सूचनेनुसार घरातील इतर माहिती पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी मिळवली. विच्छेदन अहवाल येताच त्यांचा संशय बळावला आणि विक्रांतच्या आईला ताब्यात घेतले. त्यावेळी खरा प्रकार उघड झाला.
आपण काठीने व गळा दाबून विक्रांतचा खून केल्याची कबुली राजश्री पवार हिने दिली. आपल्याला व मुलगी जान्हवीला विक्रांत तीन वर्षांपासून मारहाण व शिवीगाळ करीत होता. दि. १६ रोजी रात्री दारू पिऊन आल्यानंतर त्याने राजश्री पवार हिच्या लहान नातीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राजश्री पवार हिने त्याला काठीने मारहाण केली आणि त्याचा गळा दाबला. याप्रकरणी उपनिरीक्षक गोडसे यांच्या फिर्यादीनुसार राजश्री पवार हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ २४ तासांत आरोपीला अटक झाल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
२१ पर्यंत पोलीस कोठडी
मंगळवारी दुपारी राजश्री पवार हिला अटक करण्यात आली. तिला चिपळूण न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.