बाळ पाटणकर कोल्हापुरी क्रिकेटचे नाव राज्यात पोहोचविणारा किमयागार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:58 PM2019-07-29T14:58:40+5:302019-07-30T16:20:38+5:30
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या गेल्या ३७ वर्षांत खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या क्रिकेटचे नाव राज्यात पोहोचविण्याची किमया केवळ माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्यामुळेच शक्य झाली. किंबहुना त्यांच्या नावाशिवाय कोल्हापूरच्या क्रिकेटचे नाव अपूर्णच आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या गेल्या ३७ वर्षांत खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या क्रिकेटचे नाव राज्यात पोहोचविण्याची किमया केवळ माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्यामुळेच शक्य झाली. किंबहुना त्यांच्या नावाशिवाय कोल्हापूरच्या क्रिकेटचे नाव अपूर्णच आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले.
क्रिकेटवेडे कोल्हापुरी ग्रुप यांच्या वतीने आयोजित केलेल्या आजी-माजी क्रिकेटपटूंच्या स्नेहमेळाव्यात ‘केडीसीए’चे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने संभाजीराजे यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले, राज्याच्या क्रिकेट जगतात अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये कोल्हापूरच्या क्रिकेटचा दबदबा निर्माण करण्यासाठी गेल्या ३७ वर्षांत पाटणकर यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांनी क्रिकेटपटूंच्या हाती असोसिएशनची धुरा देऊन आपण निवृत्त होत आहोत, असे सूचित केले आहे; पण प्रत्यक्षात त्यांच्या नावाशिवाय आजही कोल्हापूरचे क्रिकेट पुढे जाऊ शकत नाही. त्यांच्या सल्ल्याची आजही व उद्याही गरज लागणार आहे. त्यामुळे सल्लागार समिती नेमून त्याच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक व्हावी. सत्काराला उत्तर देताना पाटणकर म्हणाले, हा सत्कार स्पर्धांचे प्रायोजक, खेळाडू आणि क्रिकेटशी संबंधित सर्व घटकांचा आहे.
या स्नेहमेळाव्यानिमित्त १९७२ साली प्रथमच जसदनवाला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणाऱ्या संघातील खेळाडू रघू पिसे, सदा पाटील, दीपक शेळके, राहुल सप्रे यांचा आजच्या युवा संघातर्फे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, माजी क्रिकेटपटू सदा पाटील, विजय जाधव, ‘केडीसीए’चे अध्यक्ष चेतन चौगुले, माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, ज्येष्ठ क्रिकेटपटू रघू पिसे, अभय चौगुले, अण्णासाहेब हेरवाडे, हेमुभाई वसा, विराज निंबाळकर, विजय पाटील, विजय भोसले, माजी रणजीपटू संतोष जेधे, प्रसाद कानडे, अनिल वाल्हेकर, उमेश गोटखिंडीकर, रमेश हजारे, प्रकाश वर्गीस, दिलीप सामंत, संदीप ताटे, महिला क्रिकेटपटू जाई देवणावर, सानिया पटेल, जान्हवी पाटील, रसिका शिंदे, ऋचा पाटील, आदी आजी-माजी क्रिकेटपटू व अन्य मान्यवर उपस्थित होते. गु्रपचे प्रमुख सुधर्म वाझे यांनी प्रास्ताविक केले.
असा झाला गौरव
बाळ पाटणकर यांना ‘क्रिकेटवेडे कोल्हापुरी ग्रुप’ या व्हॉट्स अॅप गु्रपतर्फे क्रिकेटची बॅट देऊन सत्कार करण्यात आला. या बॅटवर मानपत्र लिहिण्यात आले होते; तर संभाजीराजे यांनाही खासदार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल गु्रपतर्फे बॅट देण्यात आली. या बॅटवर माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, ऋतुराज इंगळे, रघू पिसे, मुंबईचे माजी रणजीपटू अवधूत झारापकर यांच्या स'ा संभाजीराजे यांनी घेतल्या.
आठवणींना उजाळा
संभाजीराजे यांनी १९८५ ते १९९५ या दशकात सेंट झेव्हिअर्स, न्यू कॉलेज, शाहू इन्स्टिट्यूटकडून शालेय ते महाविद्यालयीन क्रिकेट खेळले. यात त्यांची १७ वर्षांखालील कोल्हापूर संघात निवड झाली होती. मात्र, १२ वा खेळाडू म्हणून ते बाहेर होते. वडील शाहू छत्रपती यांनी १९ वर्षांखालील गटात कोल्हापूर संघाकडून निवड झाल्याचे कळताच एस.टी.ने प्रवास करा, असे सांगितले. त्यामुळे मला एस.टी. प्रवासाची सवय झाल्याचेही त्यांनी या आठवणीदरम्यान सांगितले.
या काळात शाहू छत्रपती यांनी बॅट घेऊन दिली होती. खेळून झाल्यावर त्या बॅटचा कंटाळा आला. त्यामुळे ती कधी तुटेल आणि मला नवीन बॅट कधी मिळेल यासाठी मी प्रयत्नशील होतो. काही केल्या ती बॅट तुटली नाही. सहकारी क्रिकेटपटू स्वरूप नाईक याला ‘तू हाफ सेंच्युरी मारलीस तर बॅट भेट देईन,’ अशी मी पैज लावली आणि त्याने ती पूर्णही केली. त्यामुळे अखेरीस त्याला ती बॅट भेट दिल्याचा किस्साही सांगितला.