म्हाळुंगे वृद्धाश्रमात अन्नदानाने साजरा केला बाळाचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:27 AM2021-03-09T04:27:26+5:302021-03-09T04:27:26+5:30
चंदगड : चार पैसे जमा झाले की वेगवेगळ्या वाटेने ते कसे खर्च करायचे याबाबत हरहुन्नरी नागरिक वेगवेगळे मार्ग शोधतात. ...
चंदगड : चार पैसे जमा झाले की वेगवेगळ्या वाटेने ते कसे खर्च करायचे याबाबत हरहुन्नरी नागरिक वेगवेगळे मार्ग शोधतात. मग, कारण कोणतेही असो. वाढदिवस साजरा करणे ही तर आज फॅशन झाली आहे. मग यासाठी कितीही खर्च झाला तरी चालतो. पण या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील विष्णू शिवाजी बुच्चे यांनी आपल्या 'रुद्र' या बाळाचा पहिला वाढदिवस म्हाळुंगे येथील सावली वृद्धाश्रमात साजरा केला.
वाढदिवसाला होणारा खर्च वृद्धाश्रमाला देऊन सर्व वृद्धांना अन्नदान दिले. वृद्धाश्रमास अन्नदान देणाऱ्या बुच्चे कुंटुंबीयाचे कौतुक होत आहे. 'डिजे'च्या तालावर मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्टीचे नियोजन करून वाढदिवस साजरे करताना पहायला मिळते. यावर लाखो रुपयांची उधळपट्टीही होती. याला बगल देत बुच्चे यांनी आपल्या बाळाचा वाढदिवस अनाथ असलेल्या वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरविले.
संपूर्ण दिवस या वृद्धासमवेत घालवून त्यांच्या दु:खावर फुंकर घालून आनंदी वातावरण निर्माण केले.
यावेळी माजी सैनिक शिवाजी बुच्चे, रंजना बुच्चे, वैशाली बुच्चे, सईबाई, रूपाली पाटील, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष दयानंद पाटील आदींसह सावली वृद्धाश्रमातील वृद्ध उपस्थित होते.
---------------------------
फोटो ओळी : म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील सावली वृद्धाश्रमात अन्नदानाने रूद्रचा वाढदिवस साजरा करताना विष्णू बुच्चे, वैशाली बुच्चे व बुच्चे कुटूंबीय. क्रमांक : ०८०३२०२१-गड-०८