नगरसेविकेच्या पतीला जागा देण्याचा ठराव मागे
By admin | Published: April 25, 2015 12:29 AM2015-04-25T00:29:25+5:302015-04-25T00:47:03+5:30
‘राजाराम’च्या बगीचा आरक्षणाचा ठरावही मागे
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर विकास प्रकल्पाच्या नव्याने केलेल्या २५५ कोटींच्या प्रारूप आराखड्यास महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली. राजेंद्रनगर परिसरातील क्रीडांगण व शाळेसाठी आरक्षित असलेली जागा (रि.स.नं. ५४१ पै) नगरसेविका जयश्री साबळे यांचे पती राजेंद्र साबळे यांच्या शिक्षण सोसायटीला भुईभाड्याने देण्याचा ठराव परिसरातील नागरिक व नरगसेवक भूपाल शेटे यांच्या तक्रारीनंतर सभेत येण्यापूर्वीच प्रशासनाने मागे घेतला. तसेच राजोपाध्येनगर येथील शाळेस गोविंद पानसरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला.
२५५ कोटी रुपये खर्चून अंबाबाई मंदिराचा विकास तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. या दृष्टीने तयार केलेला आराखडा सभेच्या मंजुरीमुळे आता राज्य शासनास पाठविला जाणार आहे. राजाराम कारखान्याच्या जागेवर बगीचा आरक्षण टाकण्याचा ठराव मागे घेण्यात आला. येथील रि.स.नं. ३७३/ब येथील हिरव्या पट्ट्यातील असणारी जागा बगीचा आरक्षित न ठेवता, उलपे मळा येथे जाण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची जागा संपादित करून रस्ता करण्याचे ठरले.
पदवीधर कर्मचाऱ्यांना जादा वेतनवाढ देण्याबरोबरच इतर कर्मचाऱ्यांचेही नुकसान करू नका, अशी उपसूचना देत, वेतनवाढीचा मुद्दा सभागृहाने मान्य केला.
प्राथमिक शाळेचे आरक्षण असलेल्या रि.स.नं. १७५/१अ पैकी ८७६ चौरस मीटर जागा खरेदी सूचना देणे, ई वॉर्डातील रि.स.नं. ५४६ येथील खुल्या जागेचे हिरव्या पट्ट्यातून रहिवाशी जागेत बदल करणे, स्टर्लिंग टॉवर ते बागल चौकापर्यंत १२ मीटर रस्त्यासाठी भूसंपादन करणे, आदी आरक्षणाचे इतर सर्व विषय पुढील सभेपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेतला.