'उद्याचा बंद मागे, पण काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 10:58 PM2024-08-23T22:58:54+5:302024-08-23T23:07:32+5:30
महाविकास आघाडीतील सर्वच नेते त्यांच्या शहरात बसणार आहेत. बंद मागे घेण्यात आला आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
Jayant Patil ( Marathi News) : बदलापूर शहरातील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाने सदर बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसून जे लोक बंद पुकारतील त्यांच्याविरोधात कारवाई करा, असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. यामुळे आता महाविकास आघाडीने हा बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण, उद्या सकाळी दहा वाजता काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार असल्याची माहिती 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
"महाविकास आघाडीने बदलापूरला जी घटना घडली त्याचा निषेध म्हणून बंदचा नारा दिला होता. पण, काही लोक कोर्टात गेली. कोर्टाने निर्णय दिला. कोर्टाचा आदर राखून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बंद करणे रद्द केला आहे. पण बदलापूर घटनेचा निषेध म्हणून राज्यभर उद्या सकाळी १० वाजता महाविकास आघाडीचे नेते आप आपल्या शहरात एक तास काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार आहेत, असंही जयंत पाटील यांनी सांगितले.
"न्यायालयाच्या निर्णयावर आम्हाला कोणतही भाष्य करायचं नाही. बदलापूरची घटना सामान्य माणसांच्या जीवाला लागली आहे. कायदा व सुव्यवस्थेतील वारंवार दिसत आहे. राज्यात अशा घटना सारख्या दिसत आहे. बदलापूर आणि राज्यातील घटनांचा निषध म्हणून महाराष्ट्रात निषेध म्हणून नोंदवण्यात येणार आहे.महाविकास आघाडीतील सर्वच नेते त्यांच्या शहरात बसणार आहेत. बंद मागे घेण्यात आला आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले, राज्यातील सर्वच घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. आरक्षणाच्या बाबतीत जे कोर्टात गेले, अनेक बाबीत कोर्टात जाण्याच काम ज्यांच्याकडे सोपवलं जातं. त्यांच्याकडेच आता हे काम सोपवलं होतं. पण, कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही अवमान करणार नाही. आंम्ही बंद मागे घेतला, असंही जयंत पाटील म्हणाले.