परताळ्यातील काळेमिट्ट दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट रंकाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:22 AM2021-04-17T04:22:13+5:302021-04-17T04:22:13+5:30
कोल्हापूर : राष्ट्रीय नदीसंवर्धन योजनेतून साडेआठ कोटी रुपये खर्च करून पर्यायी यंत्रणा उभी केल्यानंतरही शुक्रवारी परताळ्यातील काळेमिट्ट सांडपाणी थेट ...
कोल्हापूर : राष्ट्रीय नदीसंवर्धन योजनेतून साडेआठ कोटी रुपये खर्च करून पर्यायी यंत्रणा उभी केल्यानंतरही शुक्रवारी परताळ्यातील काळेमिट्ट सांडपाणी थेट रंकाळा तलावात मिसळले. गेल्या काही दिवसांपासून परताळ्यातील सांडपाण्याला दुर्गंधी सुटली होती. रंकाळ्यात जेथे हे सांडपाणी मिसळले तो भाग फेसाळलेल्या काळ्या सांडपाण्याने व्यापून गेला आहे.
परताळ्यातून थेट रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्याची यंत्रणा महानगरपालिकेने उभी केली होती; परंतु शुक्रवारी पहाटेपासून हे सांडपाणी रंकाळ्यात मिसळत असल्याचे काही नागरिकांना पाहायला मिळाले. एखाद्या उद्योगातून बाहेर पडलेले रसायनमिश्रित काळेकुट्ट सांडपाणी असते, तसेच काळे सांडपाणी परताळ्यातून थेट रंकाळ्यात मिसळत होते. त्याला प्रचंड दुर्गंधीही सुटली होती.
महापालिकेच्या ड्रेनेज विभागाला ही माहिती मिळताच पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, उपजल अभियंता रमेश कांबळे, ड्रेनेज विभागाचे प्रमुख शिवाजी पाटील यांनी शुक्रवारी दुपारी १.३० वाजता परताळ्यातून जेथे रंकाळ्यात सांडपाणी मिसळते, त्या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी मातीची पोती टाकून सांडपाणी रंकाळ्यात मिसळण्याचे बंद करण्याचा निर्णय घेतला. दुपारनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. आज, शनिवारी दुपारपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे शिवाजी पाटील यांनी सांगितले.
मातीची पोती टाकून सांडपाणी रोखले
राष्ट्रीय नदीसंवर्धन योजनेतून मिळालेल्या साडेआठ कोटी रुपयांच्या निधीतून परताळ्यापासून रंकाळ्याच्या मागील ओढ्यापर्यंत साडेचारशे एमएम जाडीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. परताळ्याच्या पश्चिम बाजूला दोन मोठी चेंबरही बांधली गेली आहेत. त्याद्वारे परताळ्यातील सांडपाणी वळविण्यात आले आहे. त्याचवेळी पूर्वीचा जलप्रवाहातील नळे मातीची पोती टाकून बुजविले होते. त्यामुळे गेल्या तीन- चार वर्षांत रंकाळ्यात सांडपाणी मिसळणे बंद झाले होते.
सांडपाणी मिसळण्याच्या दोन शक्यता
सांडपाणी रोखण्यासाठी मातीची पोती टाकून तीन नळे बंद केली होती; पण शुक्रवारी रात्री पोती कोणीतरी अज्ञातांनी काढून टाकली असावीत, अशी शंका व्यक्त केली जात आहे. दुसरी शक्यता पावसाच्या पाण्याची आहे. गेल्या दोन, तीन दिवसांत पाऊस झाल्याने परताळ्यातील पाण्याचा प्रवाह वाढला असावा आणि तीन नळ्यांतील पोती फोडून सांडपाणी रंकाळ्यात मिसळले असावे.
(सूचना - फोटो परताळा या नावाने देत आहे.)