कोल्हापुरातील सीपीआरच्या शवागृहाची दुरुस्ती होईना, नव्याला मुहूर्त मिळेना; मृतदेहांची हेळसांड
By उद्धव गोडसे | Published: November 29, 2024 05:30 PM2024-11-29T17:30:29+5:302024-11-29T17:33:22+5:30
प्रचंड दुर्गंधी, मृतदेहांची हेळसांड; डॉक्टर, कर्मचारी हैराण
उद्धव गोडसे
कोल्हापूर : सीपीआरमधील शवागृहाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. वारंवार बिघडणारी वातानुकूलित यंत्रणा, उडालेला रंग, जीर्ण झालेल्या भिंती आणि अस्वच्छतेमुळे या ठिकाणी काम करणारे डॉक्टर, कर्मचारी हैराण झाले आहेत. सीपीआर प्रशासनाने विनंती करूनही या शवागृहाची दुरुस्ती होत नाही, तर शेंडा पार्क येथे तयार असलेले शवागृह सुरू करण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून मुहूर्त मिळेना. यामुळे मृतदेहांची हेळसांड होत आहे.
दक्षिण महाराष्ट्रासह कोकण आणि कर्नाटकातून कोल्हापुरात सीपीआरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. उपचारादरम्यान दगावलेल्या रुग्णांची उत्तरीय तपासणी करावी लागते. काही मृतदेह शवागारात ठेवावे लागतात. मात्र, यासाठी शवागारात पुरेशी व्यवस्था नाही. केवळ दोन बेडची व्यवस्था असल्याने अनेकदा एकमेकांना खेटून मृतदेह ठेवावे लागतात.
यातच वातानुकूलित यंत्रणा बिघडत असल्याने त्याचा मृतदेहांवर परिणाम होतो. मृतदेहांची दुर्गंधी वाढते. याच स्थितीत इतर मृतदेहांवरील उत्तरीय तपासणीचे काम डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना करावे लागते. याची तात्पुरती दुरुस्ती व्हावी यासाठी सीपीआर प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, शेंडा पार्क येथे नवीन शवागार तयार असल्याने सीपीआरमधील शवागाराची दुरुस्ती होत नाही. दुरवस्था झालेल्या शवागारातच कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. तातडीने या शवागाराची दुरुस्ती व्हावी आणि शेंडा पार्कातील शवागार सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेंडा पार्कात २४ बेडचे शवागार
शेंडा पार्क येथे २४ बेडचे अद्ययावत शवागार तयार केले आहे. दीड वर्षापूर्वीच ही इमारत तयार झाली असून, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही सुरू झाला आहे. शवागृह सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालयासह अन्य शासकीय यंत्रणांची परवानगी आवश्यक असते. यासाठी सीपीआरकडून पत्रव्यवहार झाले आहेत. नवीन शवागृह तातडीने सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींना पुढाकार घ्यावा लागणार आहे.
अस्वच्छता, दुर्गंधी
शवागाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच सांडपाणी आणि चिखलाचे साम्राज्य असते. शवागारातील स्थिती त्याहून भयानक आहे. कोपऱ्यांमध्ये वैद्यकीय कचरा उघड्यावर पडलेला असतो. कचऱ्याने भरलेल्या पिशव्यांचा ढीग दोन-तीन दिवस पडून असतो. साहित्य विस्कटलेले असते. अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
नातेवाइकांनी थांबायचे कुठे?
मृतांच्या नातेवाइकांना थांबण्यासाठी शवागृहाबाहेर पत्र्याचे शेड आहे. या शेडचे पत्रे खराब झाले आहेत. पावसाळ्यात इथे थांबणेही शक्य होत नाही. बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. बहुतांशवेळा भटक्या कुत्र्यांचा इथे मुक्काम असतो. चिखल आणि दलदलीमुळे डासांचा त्रास वाढल्याने मृतांचे नातेवाईक आणि कर्मचारी हैराण झाले आहेत.