खराब रस्त्यांप्रश्नी शिवसेना आक्रमक
By admin | Published: July 20, 2016 12:41 AM2016-07-20T00:41:36+5:302016-07-20T00:48:35+5:30
आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या : नगरअभियंता, ठेकेदारावर फौजदारी करा; आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
कोल्हापूर : शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या प्रश्नाबाबत शिवसेना मंगळवारी आक्रमक झाली. शिवसैनिकांनी महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले. शिवाय निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणारे नगर अभियंता, उपअभियंता, ठेकेदार व सल्लागार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. यावर ठेकेदारांकडून रस्ते नव्याने करून घेतले जातील. तसेच १५ दिवसांत रस्त्यांच्या कामाचे त्रयस्थांमार्फत सर्वेक्षण करू, चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले.
शहरातील खराब झालेल्या रस्त्यांप्रश्नी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आयुक्तांच्या कार्यालयावर आंदोलनाद्वारे धडक दिली. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आंदोलनकर्ते शिवसैनिक महानगरपालिकेच्या चौकात दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी ‘हटाव हटाव, नगर अभियंता हटाव’, ‘कोल्हापूरला खड्ड्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मारला. शिवाय पुन्हा त्यांनी आयुक्त, नगर अभियंता यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यानंतर त्यांना आयुक्त पी. शिवशंकर यांनी चर्चेसाठी बोलाविले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, तीन ते सहा महिन्यांपूर्वी शहरात केलेल्या रस्त्यांची गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने दुरवस्था झाली आहे. नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ठेकेदार आणि सल्लागार संस्थेच्या संगनमतामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले आहेत. खराब रस्त्यांमुळे अपघात वाढत असून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित रस्ते नव्याने करून घ्यावेत; तसेच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांसाठी जबाबदार असणाऱ्या नगर अभियंता, उपअभियंता, ठेकेदार व सल्लागार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. याबाबत १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. सेफ सिटीतील सीसीटीव्हींबाबतची चौकशी करावी. पालिकेच्या जागा वाचविण्याचे काम करावे.
शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज म्हणाले, ‘नगरोत्थान’अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असताना त्यातील त्रुटींची माहिती देऊनही निकृष्ट दर्जाचे रस्ते कसे झाले, यासाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. शिवाजी जाधव म्हणाले, अधिकाऱ्यांनी केलेल्या कामकाजासह त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी. कमलाकर जगदाळे म्हणाले, खराब रस्ते नव्याने केल्याशिवाय ठेकेदारांची देय रक्कम अदा करू नये.
यावर आयुक्त पी. शिवशंकर यांनी खराब झालेल्या रस्त्यांचे त्रयस्थांमार्फत येत्या १५ दिवसांत सर्र्वेक्षण केले जाईल. याबाबतच्या चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित रस्ते ठेकेदारांकडून नव्याने करून घेतले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन स्थगित केले.
आंदोलनात रवी चौगुले, रणजित आयरेकर, शुभांगी साळोखे, शशी बिडकर, दत्ता टिपुगडे, तानाजी इंगळे, हर्षल सुर्वे, आदी शिवसैनिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
दरवाजावर लाथा-बुक्क्या
आंदोलनकर्ते महापालिका चौकात येताच आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराला अचानकपणे कुणीतरी आतून कडी लावली. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी आक्रमक होत प्रवेशद्वारावर लाथा-बुक्क्या मारत महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
दहा मिनिटे त्यांची दरवाजा उघडण्यासाठी झटापट सुरू होती. त्यांची आक्रमकता पाहून अखेर प्रशासनाने दरवाजाची कडी काढून त्यांना आयुक्त कार्यालयात प्रवेश दिला.
लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यासाठी येत असल्याची कल्पना देऊनही प्रशासनाने अशा पद्धतीने दरवाजाला कडी लावून रोखल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख पवार व अन्य शिवसैनिकांनी आयुक्तांसमोर प्रशासनाचा निषेध केला.