केळी उत्पादक दराअभावी कंगाल
By admin | Published: October 1, 2015 11:00 PM2015-10-01T23:00:25+5:302015-10-01T23:00:25+5:30
- व्यापारी मात्र मालामाल होत
दिलीप कुंभार - नरवाड --मिरज पूर्व भागातील केळी उत्पादक दराअभावी कंगाल झाले असून व्यापारी मात्र मालामाल होत आहेत.
पिकलेल्या केळीला एका डझनाला बाजारात २५ ते ३० रुपये ग्राहकाला मोजावे लागत असताना, तीच केळी शेतकऱ्यांकडून खरेदी करताना व्यापारी केवळ पाच ते सात रुपये डझन दराने घेतात. यामध्ये तब्बल तिप्पट-चौपट दर वाढवून व्यापारी मालामाल होताना दिसत आहेत.मिरज पूर्व भागात बहुसंख्य उत्पादकांनी जी - ९ जातीच्या केळीची लागण केली आहे. साधारणत: ४० आर क्षेत्रात १ हजार ४५० केळीची रोपे लागतात. एका केळीच्या रोपाची किंमत पाच ते सहा रुपये असते. जी-९ केळीच्या रोपवाटिका चिपरी आणि बेळगाव या ठिकाणी आहेत. तेथून केळीची रोपे खरेदी करून शेतापर्यंत पोहोच करण्यासाठी किमान एका केळीच्या रोपाला १३ रुपये खर्च येतो. मिरज, जयसिंगपूर, इचलकरंजी आदी ठिकाणी कच्ची केळी पाठविली जातात. तेथून इसरेल किंवा गंधकाची धुरी केळींना देऊन गरजेनुसार बाजारात माल आणला जातो.
मिरज पूर्वभागातील म्हैसाळला १७५ एकर, नरवाड ७० एकर, बेडग ७५ एकर याशिवाय आरग, मालगाव, एरंडोली आदी ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी-अधिक क्षेत्र आहे. केळी पिकाला सर्वाधिक पाणी लागत असल्याने शक्यतो ठिबक सिंचनचा वापर क रून शेतकऱ्यांनी पाण्याची बचत केली आहे. यामुळे ५० ते ६० टक्के वाया जाणाऱ्या पाण्याला अटकाव बसला आहे. मात्र भरघोस उत्पादन घेऊनही व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे.
कच्च्या केळींना नीचांकी दर
साधारणत: ४० आर क्षेत्रात केळी लागवड करून ती पक्व करेपर्यंत १ लाख २५ हजार रुपये खर्च येतो. मात्र व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी कंगाल झाले आहेत. सद्य:स्थितीत केळीच्या कच्च्या मालाच्या दराने नीचांकी पातळी गाठली असून, यातून शेतकऱ्यांनी शेतात गुंतवणूक केलेली रक्कमही मिळत नसल्याने शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
आम्ही गेल्या १५ वर्षापासून शेतात केळीचे पीक घेतो. मात्र सद्य:स्थिती अतिशय वाईट आहे. घातलेला खर्चही निघत नसल्याने केळीचे पीक नामशेष होण्याची शक्यता आहे. केळी पिकाला सर्वाधिक पाणी लागत असल्याने शक्यतो ठिबक सिंचनचा वापर क रून शेतकऱ्यांनी पाण्याची बचत केली आहे. यामुळे ५० ते ६० टक्के वाया जाणाऱ्या पाण्याला अटकाव बसला आहे.
- राजू सौदागर,
केळी उत्पादक, म्हैसाळ.