‘ब्याडगी,’ ‘जवारी’चा बाजारात ठसका
By admin | Published: March 29, 2015 11:52 PM2015-03-29T23:52:15+5:302015-03-30T00:12:28+5:30
मिरची खरेदीसाठी झुंबड : साखरेची घसरण थांबेना; भाजीपालाही स्वस्त
कोल्हापूर : पावसाळ्यासाठी चटणी तयार करण्यासाठी गृहिणींची मिरची खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली आहे. ‘ब्याडगी’, ‘जवारी’ मिरची खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. त्याचबरोबर चटणीसाठी लागणारा मसाला व कोथिंबीर खरेदीसाठी आठवडी बाजारात गर्दी दिसत आहे. भाजीपाल्याचे दर घसरले असून, साखरेच्या दरातील घसरण थांबलेली नाही. खराब हवामानाचा फटका फळांच्या आवकेवर बसला आहे. पावसाळ्यात पुरेल एवढी चटणी एप्रिल, मे महिन्यांत अगोदरच करून ठेवली जाते. जानेवारीनंतर मिरचीची आवक वाढण्यास सुरुवात होते. सध्या बाजारात ‘ब्याडगी,’ ‘जवारी’ मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात दिसत आहे. लालभडक ‘ब्याडगी’ जिभेला चटका देत असली तरी ‘जवारी’ मिरचीत ती मिसळली जातेच. हैदराबाद, कर्नाटकमधून सध्या मिरचीची आवक सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीचे उत्पादन चांगले झाल्याने आवकही भरपूर आहे. गेल्या वर्षीपेक्षा किलोमागे २० रुपये मिरचीचे दर घसरलेले आहेत. ‘ब्याडगी’चा दर प्रतिकिलो १३०, तर ‘जवारी’चा १०० रुपये आहे. चटणीसाठी लागणारी कोथिंबीर, आले, जिरे, तीळ, खोबरे, धने खरेदीसाठीही गर्दी दिसत आहे. तूरडाळीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरात दोन रुपयांनी घसरण झाली आहे. हरभराडाळ, शाबूदाणा, खोबरे, तीळ, जिऱ्याचे दर स्थिर आहेत. साखरेचे दर घसरू लागले आहेत. किरकोळ बाजारात बारीक साखर २६ रुपयांपर्यंत आली आहे. गेल्या आठवड्यात साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना घसरणीचा झटका बसला आहे. स्थानिक भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने दर निम्म्यावर आले आहेत. कोबी, वांगी, टोमॅटो, ढब्बू, गवार, भेंडीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर आले आहेत. काकडीची आवक वाढली असून, घाऊक बाजारात प्रतिकिलो १० रुपये दर राहिला आहे. कोथिंबिरीची आवक चांगली असून, किरकोळ बाजारात ५ रुपये असा पेंढीचा दर आहे.
दर आठवड्यात येणारा पाऊस, खराब हवामान यांमुळे यंदा फळबागा संकटात सापडल्या आहेत. द्राक्षे, कलिंगडाचे पीक धोक्यात आले असून, त्याचा आवकेवर परिणाम झाला आहे. द्राक्षांची आवक जरी होत असली तरी त्यांची गोडी व तजेलदारपणा कमी झाला आहे. रत्नागिरी, देवगड आंब्यांची आवक सुरू आहे. हापूसला पावसाचा फटका बसला असून त्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. येत्या आठ दिवसांत मद्रास व बंगलोर हापूसची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
ऊस जाऊन दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून बिले मिळालेली नाहीत. त्यात मार्चअखेर असल्याने ग्राहकांचा खिसा रिकामा आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाली काहीअंशी मंदावल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
बटाटा घसरला
बटाट्याची आवक स्थिर असूनही दरात कमालीची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात १५ रुपये किलो बटाटा, तर २० रुपये किलो कांदा झाला आहे.