बदलापूर, विटा विजयी

By admin | Published: February 18, 2015 11:34 PM2015-02-18T23:34:25+5:302015-02-18T23:43:23+5:30

नगराध्यक्ष सुवर्णचषक क्रीडा स्पर्धा : भद्रावती, इस्लामपूर व्हॉलिबॉलमध्ये अव्वल

Badlapur, Vita, won | बदलापूर, विटा विजयी

बदलापूर, विटा विजयी

Next

विटा (जि. सांगली) : विटा नगरपरिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नगराध्यक्ष सुवर्णचषक कबड्डी स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगरपरिषद, तर खो-खो स्पर्धेत विटा नगरपरिषदेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी पासिंग व्हॉलिबॉल स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपरिषदेचा संघ, तर व्हॉलिबॉल शूटिंगमध्ये इस्लामपूर नगरपरिषदेचा संघ विजेता ठरला. या स्पर्धेतील सर्व विजेत्या संघांना माजी आ. सदाशिवराव पाटील, क्रीडा स्पर्धा समितीचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, प्रक्षप्रतोद वैभव पाटील, उपाध्यक्ष कृष्णत गायकवाड, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
विटा येथील लोकनेते हणमंतराव पाटील क्रीडानगरीत गेल्या चार दिवसांपासून राज्यस्तरीय नगराध्यक्ष सुवर्णचषक क्रीडा स्पर्धा सुरू होत्या. आज चौथ्या दिवशी या क्रीडा स्पर्धेची सांगता आज मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धांसाठी राज्यातील ७७ नगरपरिषदांचे सुमारे १ हजार ३०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा वैयक्तिक व सांघिक पध्दतीने घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या प्रारंभी उत्कृष्ट संचलन केल्याबद्दल बदलापूर (जि. ठाणे) नगरपरिषदेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
बुध्दिबळ स्पर्धेत इचलकरंजी पालिकेचे अजय जाधव (प्रथम), अचलपूर पालिकेचे नीलेश जाधव (द्वितीय), दारव्हा जि. यवतमाळ येथील तुकाराम साबळे (तृतीय), तर विटा नगरपरिषदेचे प्रकाश कांबळे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला. कॅरममध्ये पुरुष गटात धीरज सारवाण, प्रमोद बरसे (दोघेही काटोर नगरपरिषद, जि. नागपूर) व भरत बडदेला (अचलपूर नगरपरिषद, जि. अमरावती) यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच कॅरममध्ये महिला गटात सौ. रसिका कुलकर्णी (मालवण), सौ. सुवर्णा पवार (इचलकरंजी) व पल्लवी पाटील (रत्नागिरी नगरपरिषद) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले.
तसेच बॅटमिंटन स्पर्धेत बी. एम. स्वामी (मालवण नगरपरिषद), संदीप तारम (तिरोरा (जि. गोंदिया) तसेच कल्याण रक्षे सातारा नगरपरिषद या खेळाडूंनी प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केला. सहा कि. मी. चालणे स्पर्धेत प्रशांत जाधव (राजापूर), अंकुश कुडोल (बदलापूर) व मंगेश माईन (रत्नागिरी नगरपरिषद) यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले, तर ५० वर्षांवरील ६ कि. मी. चालणे स्पर्धेत प्रकाश गुजर (अचलपूर), अशोक गाडे (वाई), देवीदास कुंभार (इंदापूर नगरपरिषद) यांनी प्रथम, व्दितीय, तृतीय व डॉ. दामोदर लड्डा (दारव्हा नगरपरिषद) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेत सहा कि. मी. चालणे महिला गटात सौ. पूजा करेलकर (मालवण नगरपरिषद), सौ. पल्लवी पाटील व सौ. सपस तळेकर (रत्नागिरी नगरपरिषद) या पहिल्या तीन विजेत्या ठरल्या. (वार्ताहर)


पंढरपूरचा दणदणीत विजय
नगराध्यक्ष सुवर्णचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात पंढरपूर नगरपरिषदेच्या संघाने फलटण नगरपरिषदेच्या संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. नगराध्यक्ष सुवर्णचषक क्रिकेट स्पर्धेत पंढरपूर नगरपरिषदेचा संघ विजेता, तर फलटणचा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत पनवेल नगरपरिषदेने तिसरा, तर विटा नगरपरिषदेच्या संघाने चौथा क्रमांक पटकाविला.आज, बुधवारी विटा येथे उपांत्य व अंतिम फेरीचे क्रिकेटचे सामने झाले. फलटण विरूध्द विटा व पंढरपूर विरूध्द पनवेल नगरपरिषद संघ असे सेमीफायनलचे सामने झाले. यावेळी फलटण संघाने विटा संघाचा २ धावांनी, तर पंढरपूर संघाने पनवेल संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पंढरपूर विरूध्द फलटण संघात झालेल्या पाच षटकांच्या अंतिम सामन्यात पंढरपूर संघाने फलटण संघाचा ३ षटकात ८ गडी राखून पराभव केल्याने पंढरपूर नगरपरिषदेचा संघ विजेता ठरला. विटा नगरपरिषदेचे पक्षप्रतोद वैभव पाटील व मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याहस्ते विजेत्या संघांना गौरविण्यात आले.

नगरपरिषद निहाय निकाल असे
कबड्डी - बदलापूर नगरपरिषद, जि. ठाणे (प्रथम), इचलकरंजी (व्दितीय), तर काटोर, जि. नागपूर (तृतीय). व्हॉलिबॉल पासिंग - भद्रावती जि. चंद्रपूर (प्रथम), आष्टा जि. सांगली (व्दितीय), खापा जि. नागपूर (तृतीय). व्हॉलिबॉल शुटिंग - इस्लामपूर जि. सांगली (प्रथम), फलटण जि. सातारा (व्दितीय), इचलकरंजी जि. कोल्हापूर (तृतीय). खो-खो स्पर्धा - विटा अ संघ जि. सांगली (प्रथम), इचलकरंजी जि. कोल्हापूर (व्दितीय) व विटा नगरपरिषदेच्या ब संघाने तिसरा क्रमांक पटकाविला.

Web Title: Badlapur, Vita, won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.