विकतचा वाईटपणा
By admin | Published: March 7, 2017 12:08 AM2017-03-07T00:08:44+5:302017-03-07T00:08:44+5:30
विकतचा वाईटपणा
ज्ये ष्ठ पत्रकार अणि माझे वडील सु. रा. देशपांडे यांचे निधन होऊन सोमवारी (दि. ६) एक महिना झाला. दरम्यानच्या काळात सर्व क्षेत्रांतील अनेकजण सांत्वनासाठी आले होते. त्यातील अनेकांनी त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या. त्यातील ही एक आठवण.
सकाळच्या आजरा-कोल्हापूर एस. टी. बसची प्रवासी वाट पाहत होते. आगारातून गाडी आली. सर्व प्रवासी गडबडीने आत चढले. मात्र, गाडीत प्रचंड घाण होती. वास येत होता. गाडी स्वच्छ केली नव्हती. माझे वडीलही या गाडीत होते. त्यांनी सर्वच प्रवाशांना आवाहन केलं की, या घाण गाडीतून आपण प्रवास करायचा नाही. पैसे देऊन जर प्रवास करतो, तर गाडी स्वच्छ पाहिजे. सर्वजण खाली उतरले. वाहतूक नियंत्रकाला हा प्रकार सांगितला. गाडी परत आगारात पाठवली. ती स्वच्छ करून आल्यानंतर मग सर्वजण कोल्हापूरला निघाले.
प्रसंग प्रातिनिधिक आहे. तो केवळ माझ्या वडिलांच्या संदर्भात होता म्हणून इथं सांगण्याचं प्रयोजन नाही, परंतु विकतचा वाईटपणा घेण्याची वृत्ती असणारे मोजके का असेना कार्यकर्ते आहेत, म्हणून लोकप्रतिनिधींपासून ते प्रशासनापर्यंत अनेकांवर वचक राहतो ही वस्तुस्थिती आहे. सध्या पावलापावलांवर अगणित प्रश्न दिसून येतात. सर्वसामान्यांची अवस्था तर अतिशय केविलवाणी असते. आवाज चढवून बोलणाऱ्याची कामं होतात आणि बाजू बरोबर असणाऱ्याचं ऐकूनही घेतलं जात नाही. एकाच रस्त्यावर दोन-दोनदा डांबर टाकून पैसे काढणारे कंत्राटदार आणि त्यांना पोसणारे पुढारी, गरज नसताना बांधकाम काढणारे, शास्त्रीयदृष्ट्या, व्यावहारिक विचार न करता कोट्यवधी रुपयांच्या भल्यामोठ्या पाणी योजना आखणाऱ्यांना कुणीतरी, कधीतरी जाब विचारला पाहिजे.
जिल्ह्यातही अशा अनेक इमारतींना उद्घाटनानंतर घातलेली कुलपं चार-पाच वर्षांनंतरही काढलेली नाहीत. मग हे कोट्यवधी रुपये कुणासाठी खर्च केले, याची विचारणा व्हायला हवी. गेल्याच वर्षी बेलबागेतील डांबरी रस्ता करताना डांबर कुठं दिसत नव्हतं. खडीच्या पावडरचाच धुरळा महिनाभर ऊठत होता. इथं कुणी जाब विचारला नाही. गणेशोत्सवापासून ते नगरसेवकाच्या वाढदिवसानिमित्त घातलेले मंडप गणपती विसर्जन झालं तरी आणि वाढदिवस झाला तरी पुढे काही दिवस काढले जात नाहीत. नागरिकांना दुसऱ्या अडचणीच्या रस्त्यानं जावं लागतं; पण हे विचारण्याचा वाईटपणा कोण
घेणार?
कॉलनीतच नळांना मोटार लावलेल्या असतात आणि इतरांना पाणी कमी मिळतं, पण विचारणार कोण? साधी गोष्ट, कोणत्याही गल्लीच्या वळणावर गाड्या पार्किंग करून ठेवू नयेत. कारण वळणावरून येणाऱ्याला पुढच्या गाड्या दिसत नाहीत. ठिकठिकाणी हे दिसत असूनही रस्त्यांवर असणाऱ्या या गाड्या हलवा म्हणून कोण सांगून वाईटपणा घेणार? शाळांच्या प्रवेशापासून ते एस.टी. वेळेवर सुटण्यापर्यंत, वेळेत कार्यालयात अधिकारी, कर्मचारी जागेवर असण्यापासून ते पोलिस ठाण्यात गेल्यावर किमान धडपणे तक्रार घेण्यापर्यंत अनेक ठिकाणी सामान्यांना चांगला अनुभव येत नाही.
रात्री बारा वाजता रस्त्यावर, स्टँडवर मोटारसायकल लावून त्यावर केक ठेवून फटाकड्या वाजवून, केक कापून, तोंडाला केक फासण्याचं फॅड वाढलंय. मोठ्यानं डॉल्बी वाजविला म्हणून रात्री पोलिसांना फोन करून सांगायचं म्हटलं तर पोलिसच येऊन इथं अमुकअमुक यांनीच फोन करून आम्हाला सांगितलंय, परत गोंधळ करू नका, असं पोरांनाच सांगून जातात. पोरं आयुष्यभर ज्यानं तक्रार केली, त्यांचा जाता-येता पंचनामा करायला रिकामी. त्यामुळं सामान्यांची फार मोठी कुचंबणा होते. अशावेळी मग समाजासाठी वाईटपणा विकत घेणाऱ्याची गरज आहे असं प्रकर्षानं वाटायला लागतं. तसे मोजके का असेना, परंतु प्रामाणिक कार्यकर्ते आहेत म्हणून अजूनही सार्वत्रिक वचक आहे. सामान्यांच्या, समाजाच्या भल्यासाठी वाईटपणा विकत घेणारे कार्यकर्ते वाढण्याची गरज आहे आणि त्यांना समाजाने पाठबळ देण्याचीही गरज आहे.
- समीर देशपांडे