बडोलेंना महाराष्ट्रातून हाकला
By Admin | Published: October 16, 2016 12:16 AM2016-10-16T00:16:54+5:302016-10-16T00:16:54+5:30
संभाजीराजे छत्रपती; न्यायहक्कांसाठी मराठा समाजाचा मोर्चा
कोल्हापूर : न्यायहक्क मिळविण्यासाठी मराठा समाजाचे राज्यभर मूक मोर्चे सुरू आहेत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाच्या हक्काला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी या मोर्चातून करण्यात येत आहे. परंतु, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या मोर्चाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यामुळे मंत्री बडोले यांना महाराष्ट्रातूनच हाकलून देण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी येथे केली.
संभाजीराजे म्हणाले, आक्रमक अशी मराठा समाजाची ओळख आहे, तरीही, राज्यभर लाखोंच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्धपणे मराठा क्रांती मूक मोर्चे काढण्यात येत आहेत. याद्वारे मराठा समाजाने न्यायहक्कांच्या मागण्यांसाठीही काढण्यात येणाऱ्या संबंधित मोर्चाद्वारे एक आदर्श घालून दिला आहे. त्यातून मराठा समाजाने आपली एकजूट दाखवून दिली आहे. सकल मराठा समाज हेच नेतृत्व मानून मोर्चे यशस्वी झाले आहेत. इतर समाजासाठी हे आदर्शवत आहे. असे असताना मंत्री बडोले यांनी मराठा क्रांती मूक मोर्चाबाबत केलेले वक्तव्य साफ चुकीचे आहे. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांनी बडोलेंचा बंदोबस्त
करावा : उदयनराजे यांची मागणी
कोल्हापूर : मराठा मोर्चाबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या बुद्धीची कीव येते, त्यांचा मुख्यमंत्र्यांनी तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे मोर्चानंतर दसरा चौकात पत्रकारांशी बोलताना केली. उदयनराजे भोसले हे मोर्चात सहभागी झाले.
उदयनराजे हे शुक्रवारी रात्रीच कोल्हापुरात आले होते. अकराच्या सुमारास ते कारमधून शहाजी कॉलेजपर्यंत आले. तिथून ते दसरा चौकात आले. तेथील वॉर रूमच्या दारातच उभे राहून त्यांनी मोर्चातील मुलींची भाषणे ऐकली. मोर्चा संपल्यावर पत्रकारांशी बोलताना बडोले यांच्यावर हल्ला चढविला.
ते म्हणाले, ‘बडोले हा माणूस कमकुवत बुद्धीचा आहे. मराठा मोर्चे शांततेत निघत असताना त्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही; परंतु त्यांना जास्त किंमत न देणेच योग्य वाटते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची दखल घेऊ नये. मराठा समाजाच्या मोर्चांसंबंधी असे विधान करून कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा बंदोबस्त मुख्यमंत्र्यांनी करावा.(प्रतिनिधी)
काय म्हणाले होते बडोले?
कोपर्डी घटनेचा आम्ही निषेध केला. नाशिक येथील तळेगाव येथे घडलेल्या घटनेचाही आम्ही निषेध केला. त्यांच्याकडे जास्त पैसे असल्यामुळे त्यांचे मोर्चे मोठे निघत आहेत. आमच्याकडे तेवढे पैसे नसल्यामुळे मोठे मोर्चे निघत नाहीत, असे बडोले यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हलमध्ये बोलताना सांगितले होते. अनुसूचित जातीच्या लोकांवर अत्याचार झाला, तर वेळप्रसंगी आपण मंत्रिपदाचाही राजीनामा देण्यास मागे पुढे पाहणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
बडोले यांनी राजीनामा द्यावा : सतेज पाटील
न्याय हक्क मिळविण्यासाठी मराठा समाजाचे राज्यभर मूक मोर्चे निघत असताना सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या मोर्चाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यामुळे मंत्री बडोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तो न दिल्यास मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयात सरकारने व्यवस्थित बाजू मांडून कायदेशीर लढाई लढावी.
- आमदार सतेज पाटील