नवरात्रीतील सुरक्षेसाठी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या तीन दारात बॅग स्कॅनर, गुरुवारपासून मंदिर परिसराची स्वच्छता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 01:04 PM2023-10-03T13:04:21+5:302023-10-03T13:04:56+5:30
२० स्क्रीनद्वारे थेट दर्शन
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने सुरक्षेची खबरदारी घेतली जात असून त्यासाठी मंदिराच्या तीनही दरवाजांबाहेर बॅग स्कॅनर बसविण्यात येत आहेत. तर गुरुवारपासून मंदिर परिसराची स्वच्छता होणार आहे.
गणेशोत्सव संपल्यानंतर आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख देवता असलेल्या अंबाबाई मंदिराच्या नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक कोल्हापूरला येतात. यंदा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने नवरात्रोत्सवाचे नियोजन केले जात असून त्याची सुरुवात मंदिर परिसर स्वच्छतेने होणार आहे. मुंबईतील आय स्मार्ट फॉसिटिक कंपनीमार्फत गुरुवारपासून स्वच्छतेला प्रारंभ होणार आहे.
उत्सव काळात मंदिर व बाह्य परिसरातील सुरक्षा वाढवण्यात येत असून पूर्व, दक्षिण व उत्तर दरवाजावर बॅक स्कॅनर बसविण्यात येणार आहेत. हे स्कॅनर समितीकडे आले असून पुढील दोन चार दिवसांत ते कार्यरत केले जातील. माजी खासदार संभाजीराजे यांच्या निधीतून साऊंड सिस्टीम बसविण्यात आली आहे. गाभाऱ्यापर्यंत जाणाऱ्या पूर्व दरवाजाबाहेर स्टीलचे बॅरिकेटस बसविण्यात येत आहेत.
२० स्क्रीनद्वारे थेट दर्शन
ज्या भाविकांना गाभाऱ्यापर्यंत जाऊन अंबाबाईचे दर्शन घेणे शक्य नाही किंवा रांगेत असलेल्या भाविकांना देवीची पूजा, गाभाऱ्यातील विधी दिसावेत यासाठी मंदिर व बाह्य परिसरात २० स्क्रीन बसविण्यात येत आहेत. तीन मोठे एलईडी स्क्रीन मंदिराच्या दरवाजाबाहेर व अन्य स्क्रीन मंदिर आवारात असतील. बिंदू चौकासह शहरात ठिकठिकाणी स्क्रीन बसविले जाणार आहेत.
इमारतीची स्वच्छता व वायरिंग
शेतकरी संघाच्या इमारतीतून दर्शन रांग वळविण्यात येणार असून सध्या या इमारतीच्या दोन्ही मजल्यांची स्वच्छता व वायरिंगचे काम सुरू आहे. कित्येक वर्षे इमारत बंद असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात धूळ आहे, रांगाच्या दृष्टीने देवस्थान समितीला अन्य सोयीसुविधा कराव्या लागणार असल्याने त्यादृष्टीने इमारतीची अंतर्गत कामे केली जात आहेत.