उचगावमध्ये बगॅस डेपोला आग
By admin | Published: April 15, 2015 12:40 AM2015-04-15T00:40:55+5:302015-04-15T00:40:55+5:30
पावणेदोन कोटींचे नुकसान : रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरु
उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील मणेर मळ्यातील बगॅस डेपोला मंगळवारी भीषण आग लागून बगॅसच्या सहा गंज्या जळून खाक झाल्या. आग इतकी प्रचंड होती की, तिच्या ज्वालांमुळे परिसरातील बंगल्यांच्या काचा तडकल्या. यामध्ये सुमारे पावणेदोन कोटींचे नुकसान झाले असून, रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
मंगळवारी दुपारी बारा वाजता बगॅस डेपोला आग लागली. सात बंब, तीन पाण्याचे टँकर व पन्नासच्यावर कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आग नेमकी कोणत्या कारणांमुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. हा बगॅस डेपो कोल्हापूर डिस्टिलरी लिमिटेड यांचा असून, डी. के. कलाणी त्याचे मालक आहेत. मात्र, या बगॅसची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी त्यांनी करण एजन्सीला दिली आहे.
मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास बगॅस डेपोला आग लागल्याचे परिसरातील ग्रामस्थांना समजले. त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलास याबाबत कळविले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब, जवाहर साखर कारखान्याचे दोन, कागल नगरपालिकेचे दोन, भोगावती साखर कारखान्याचा एक बंब असे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांना तीन खासगी पाण्याचे टँकर मदत करीत होते. साठ-साठ फुटी बगॅसच्या गंजी असल्याने आग विझविण्याचे काम कठीण बनत होते. टँकरवर चढून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. हे प्रयत्न जर झाले नसते, तर लगतच्या आणखी वीस बगॅस गंज्यांना आग लागली असती. मात्र, ते सुदैवाने टळले. या आगीत जीवितहानी झाली नाही. नजीकच्या शेतीमधील ऊसपीक आगीच्या ज्वालांमुळे करपून गेले.
डिस्टीलरीचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनीही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी मोठी गर्दी होती. गांधीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. आग रात्रभर धुमसत राहण्याची शक्यता घटनास्थळावरील उपस्थितांतून वर्तविली जात होती. (वार्ताहर)