लाच देणाऱ्या वकिलास अटक

By Admin | Published: October 7, 2016 12:40 AM2016-10-07T00:40:41+5:302016-10-07T00:42:05+5:30

पन्हाळ्यात कारवाई : चंदगडच्या फौजदाराने दाखविले धाडस

Bailable prosecutors arrested | लाच देणाऱ्या वकिलास अटक

लाच देणाऱ्या वकिलास अटक

googlenewsNext

कोल्हापूर/पन्हाळा : अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जास न्यायालयात विरोध करू नये म्हणून फौजदारास चक्क दहा हजारांची लाच देताना पन्हाळ्याच्या वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी रंगेहात पकडले. माणिक नामदेव डवंग (रा मंगळवार पेठ, पन्हाळा) असे त्याचे नाव आहे.
सध्या चंदगड पोलिस ठाण्यात फौजदार म्हणून नेमणुकीस असलेल्या दिलीप बाबूराव तिबिले यांनी त्यासंबंधीची तक्रार दिली. लाच देताना अटक होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे या विभागातून सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४४/२०१६ अन्वये अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याचा गुन्हा (भादंविसं कलम ३६३, ३६६ व बाल लैंगिक कायदा - पोस्को कलम ४) नोंद आहे. त्यामध्ये पाच संशयित आरोपी आहेत. त्यापैकी सागर चंद्रकांत मिरजे (रा. बुधवार पेठ, पन्हाळा) यास अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे वकीलपत्र माणिक डवंग यांनी घेतले आहे. ज्या चार आरोपींना अद्याप अटक झालेली नाही, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज डवंग हे गडहिंग्लज न्यायालयात दाखल करणार आहेत. त्या अर्जास न्यायालयात विरोध करू नये म्हणून अ‍ॅड. डवंग यांनी फौजदार तिबिले यांना ५० हजार रुपयांची लाच देऊ केली; परंतु तिबिले यांना ती लाच रक्कम स्वीकारावयाची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी (दि. ५) तक्रार केली.
शासकीय लोकसेवकास लाच देणे हा गुन्हा होतो; त्यामुळे गुरुवारी पन्हाळा येथे दोन पंचांच्या समक्ष अ‍ॅड. डवंग यांच्याविरुद्ध सापळा रचण्यात आला. डवंग यांनी तक्रारदार दिलीप तिबिले यांना पन्हाळा एस. टी. स्टॅँड येथे बोलावले. तेथील हॉटेल शिवराजसमोर तक्रारदार यांच्या गाडीमध्ये १० हजार रुपयांची लाच देऊन उर्वरित रक्कम नंतर देतो असे सांगत असतानाच त्यांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अन्वये ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक उदय आफळे, सहायक फौजदार मनोहर खणगावकर, हवालदार श्रीधर सावंत, मोहन सौंदत्ती, दयानंद कडूकर, सर्जेराव पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला. फौजदार तिबिले हे मुळचे शिंदेवाडीचे असून त्यांनी यापूर्वी करवीर व पन्हाळा पोलिस ठाण्यातही काम केले आहे.

असे आहे मूळ प्रकरण
पन्हाळ्यातील एका तरुणाचे कोवाड हे आजोळ. त्यामुळे तो नेहमी कोवाडला जात असे. त्यातून तेथील एका अल्पवयीन मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. तो कॉलेजला जातो असे सांगून २६ सप्टेंबर २०१६ ला त्या मुलीसह पळून गेला. म्हणून मुलीच्या वडिलांनी संबंधित तरुण, त्याचे आईवडील व बहीण-भाऊ अशा पाच जणांविरुध्द तक्रार दिली. त्यातील तरुणास पन्हाळा पोलिसांनी अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
जिल्ह्यातील पहिलीच घटना : लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, असा फलक सर्वच शासकीय कार्यालयांत लावलेला दिसतो; परंतु लाच घेताना अटकेची कारवाई ही आता सर्रास होत आहे. राज्यात रोज कुठे ना कुठे दोन तरी सरकारी कर्मचारी व अधिकारी लाच घेताना पकडले जात आहेत; परंतु लाच देणाऱ्यास अटक होण्याची कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. राज्यभरात आतापर्यंत अशा सुमारे दहा कारवाया झाल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Bailable prosecutors arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.