बळिराजा हीच खरी बहुजन संस्कृती

By admin | Published: October 26, 2014 12:18 AM2014-10-26T00:18:34+5:302014-10-26T00:18:54+5:30

जे. बी. शिंदे : बळिराजा महोत्सव समितीतर्फे सन्मान पुरस्काराचे वितरण

Bailaraja is the real Bahujan culture | बळिराजा हीच खरी बहुजन संस्कृती

बळिराजा हीच खरी बहुजन संस्कृती

Next

कोल्हापूर : बहुजन नायक, महाप्रतापी व शेती संस्कृतीचा उद्गाता बळिराजा, बळिराम व सुभद्रा यांची, माणसांनी माणसासारखे कसे वागावे ही आदर्श घालून देणारी वंशपरंपरा म्हणजे देशातील बहुजनांची संस्कृती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. जे. बी. शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले.
बळिराजा महोत्सव समितीतर्फे शुक्रवारी (दि. २४) बिंदू चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी ‘बळिराजा संस्कृती आणि सद्य:स्थिती’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दलितमित्र व्यंकाप्पा भोसले होते.
शिंदे म्हणाले, मूठभर लोभी, ऐतखाऊ लोकांनी फसवून व घातकी डाव आखून बहुजन नायकाचे राज्य हिसकावले, हा इतिहास आहे. बहुजन नायकाचा विकृत स्वरूपात खोटा इतिहास, भाकडकथा लिहिल्या तरीही अभिजनांना या बहुजन नायकाचा प्रजाहितदक्ष, स्त्रियांबद्दलचा आदराचा इतिहास लपविता आला नाही, हाच बळिराजाच्या उज्ज्वल संस्कृतीचा पुरावा आहे. म्हणूनच बळी संस्कृती ही भारतीयांची संस्कृती आहे. बळिराजाच्या वंशातील सर्वच राजांनी समतेचे, बंधुभावाचे राज्य केले; म्हणून सद्य:स्थितीत बहुजनांनी बळी संस्कृतीप्रमाणे एकत्र येणे गरजेचे आहे.
दरम्यान, पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ‘बळिराजा सन्मान’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते प्राचार्य डॉ. विलासराव पोवार, शिरोळ तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारे खंडेराव हेरवाडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला कार्यकर्त्या सीमा पाटील यांचा समावेश आहे.
बळिराजा पुरस्काराच्या रूपाने झालेला सन्मान म्हणजे आम्ही करीत असलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्याचा गौरव आहे. यामुळे हे कार्य पुढे जोमाने करण्याची ऊर्मी मिळणार असल्याची भावना पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांनी व्यक्त केल्या. जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.
डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले, प्रजाहितदक्ष राजाला फसवून, लुबाडून घात करणाऱ्यांच्या प्रतीकात्मक निषेधाला विरोध होणे हे दुर्दैवी आहे. देशभरात वामनाचे मंदिर कुठेही नाही; कारण खुन्यांना प्रतिष्ठा देणे हे भारतीय संस्कृतीत बसत नाही. व्यंकाप्पा भोसले म्हणाले, बहुजनांच्या एकतेत देशाची प्रगती व सन्मान आहे. प्रतिगाम्यांनी विरोधासाठी बहुजनांची निवड केली. राजर्षी शाहूंचे वारस सत्यशोधक असून त्यांनी कधी सत्याची वाट सोडलेली नाही. प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील म्हणाले, राजर्षी शाहूंप्रमाणे इथल्या मराठा समाजाने आपला अहंभाव सोडून देऊन बहुजन एकतेचे कार्य करावे. दिगंबर लोहार यांनी स्वागत केले. अ‍ॅड. सचिन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. गौतम कांबळे यांनी आभार मानले. यावेळी गणपतराव बागडी, बाबूराव कदम, दिलीपकुमार जाधव, विकास जाधव, मोहन पाटील, राजाराम धनवडे, संभाजी जगदाळे उपस्थित होते.

Web Title: Bailaraja is the real Bahujan culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.