‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे उद्या उद्घाटन
By Admin | Published: April 1, 2016 01:05 AM2016-04-01T01:05:54+5:302016-04-01T01:24:07+5:30
ज्योत्स्ना शिंदे : अभियानासाठी पाच लाख २२ हजारांची तरतूद
कोल्हापूर : शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्यातर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान व ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या, शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, या अभियानाअंतर्गत २०१५-१६ या वर्षासाठी पाच लाख २२ हजार निधीची तरतूद केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
राजाराम कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण समितीचे सभापती अभिजित तायशेटे, शिक्षण आयुक्त (पुणे) डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, शिक्षण संचालक नामदेवराव जरग, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील उपस्थित राहणार आहेत.
शिंदे म्हणाल्या, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची गळती टप्प्याटप्प्याने विहीत कालावधीत कमी करणे, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण २०२० पर्यंत शून्य टक्क्यांवर आणणे, माध्यमिक शाळांतील दहावीपर्यंत मुलींच्या गळतीचे कमाल प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत विहीत कालावधीमध्ये खाली आणणे, माध्यमिक स्तरावर नववीच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादन क्षमतांचा शोध घेऊन त्यामध्ये वाढ करणे, नववीच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये लिंग समभावविषयक जाणीवजागृती निर्माण करणे, उपक्रमशील व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व शाळांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक करणे, असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
यावेळी उपशिक्षणाधिकारी टी. एल. मोळे, एस. बी. पाटील, एस. ए. शेख, ए. एम. आकुर्डेकर, आर. व्ही. कांबळे, एस. के. यादव, आर. वाय. पाटील, यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अभियानासाठी ११ लाख ६५ हजार खर्च अपेक्षित
या अभियानासाठी ११ लाख ६५ हजार खर्च अपेक्षित आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या सहकार्यामुळे सन २०१५-१६ या वर्षासाठी पाच लाख २२ हजार इतक्या निधीची तरतूद केल्याचे सांगण्यात आले.