कोल्हापुरातील गारगोटीच्या मिल्खासिंगची परिस्थितीशी जीवघेणी शर्यत, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत; मदतीची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 12:17 PM2023-03-17T12:17:09+5:302023-03-17T12:17:36+5:30
हरयाणा, बंगळुरू, मंगलोर, नाशिक, पांजा, उत्तर प्रदेश, दिल्ली, नाशिक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवली
कोल्हापूर : खेडूत (ता. भूदरगड) येथील बजरंग महादेव चव्हाण हे धावपटू आर्थिक दुर्बलता आणि अशिक्षितपणामुळे मजूर बनले आहेत. तीस सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक मिळवणाऱ्या या राष्ट्रीय खेळाडूची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे.
वयाच्या ६७ व्या वर्षी सतत धावणारा हे महाराष्ट्राचा मिल्खासिंग एवढी पदके जिंकूनही गवंड्याच्या हाताखाली काम करतात. शेतमजूर म्हणून घाम गाळतात. ते पाखरासारखे पळतात. म्हणून त्यांना पाखऱ्या या टोपण नावाने तालुका ओळखतो. तरीही त्यांना मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी, जबाबदार अधिकाऱ्यांकडे वेळ नसल्याचे चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची इच्छा असून, पैसे, शिक्षण नसल्याने चव्हाण वंचित राहिले. स्पर्धेमध्ये भाग घेतानाही त्यांना असंख्य अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यांच्याकडे कुत्सीत नजरेने पाहून काही स्पर्धेच्या ठिकाणी त्यांना बाजूलाही करण्यात आले आहे; पण त्यांनी जिद्द सोडली नाही. हरयाणा, बंगळुरू, मंगलोर, नाशिक, पांजा, उत्तर प्रदेश, दिल्ली, नाशिक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवली आहे.
विविध ठिकाणच्या दहा स्पर्धांमध्ये ते चमकले आहेत. त्यांनी खरगपूर येथे झालेल्या ४२ व्या नॅशनल मास्टर्स ॲथलेट चॅम्पियनशिप स्पर्धेत चव्हाण ८०० मीटरमध्ये आणि पंधराशे मीटर धावण्यात पहिला क्रमांक तर ४०० मीटरमध्ये दुसरा क्रमांक, ५००० मीटर मध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. गरिबी असली तरी आपल्या गावातली मुले लष्करामध्ये दाखल व्हावीत, यासाठी त्यांना मोफत धावण्याचे प्रशिक्षण ते देतात.
ये हमारा वाडेका बूट है
चव्हाण यांनी पंजाबला जेव्हा स्पर्धा जिंकली, त्यावेळेला त्याला पंजाबी खेळाडूने विचारले, तू कोणते बूट घातले होते ? त्यावेळेला मोडक्या हिंदी भाषेमध्ये ते म्हणाले ‘ये हमारा वाडेका बूट है’ त्या पंजाबीला समजेना हे कोणत्या कंपनीचे बूट आहेत. त्यावेळी दुसऱ्या महाराष्ट्रीयन माणसाने समजून सांगितले. खेड्यामध्ये उसाच्या पाल्याला वाडे म्हणतात, ते कापून जनावरांना आणण्यासाठी जे बूट वापरतो तेच हे बूट आहेत. हे ऐकल्यावर पंजाबमधल्या त्या दिलदार खेळाडूने त्यांच्यासाठी एक चांगले बूट विकत आणून भेट दिले होते.