गगनबावड्याच्या घाटात दडलाय बकासुराचा वाडा, ३५० फूट खोल दरीत हाय हा वाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 11:18 AM2022-02-08T11:18:30+5:302022-02-08T11:33:45+5:30
या गुहेचे अंतगृह वैशिष्ट्यपूर्ण आहे. आत शयनगृह, पाण्याचे कुंड आहे. १२ खांबांचे सभागृह आहे.
आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर व समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर असलेली ऐनारी गुहा ही बकासुराचा वाडा म्हणून प्रचलित आहे. ऐनारी गावाच्या नावावरून या गुहेला ऐनारी नाव पडले असले तरी हाच तो बकासुराचा प्रदेश जेथे भीमाने बकासुराला मारले, असे लोककथांमध्ये सांगितले जाते. या गुहेच्या पायथ्याशी राकसवाडा आहे.
ही गुहा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये झाकून गेली होती. ग्रामस्थांनी श्रमदानाने गुहेचे तोंड खुले केले. या गुहेपासून ४ किलोमीटरवर वेसरफ (ता. गगनबावडा) ची हद्द सुरू होते. गगनगड येथून ६ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या या गुफांमधून प्राणी, वटवाघळांचा मुक्तसंचार आहे. या अपरिचित बकासुराच्या वाड्याची साहस मोहीम कोल्हापुरातील वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटरचे देवेंद्र भोसले व ऍडव्हेंचर गिअरचे गिर्यारोहक विनायक कालेकर यांनी रविवारी आयोजित केली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडापासून अगदीजवळ ही गुहा आहे. बकासुराचा या भागात संचार असायचा. त्याची स्मृती म्हणून दरवर्षी येथील शेतकरी प्रतीकात्मक बैल करून छोटीशी बैलगाडी जुंपतात त्यावर भाताच्या गोण्या व शिजविलेला भात ठेवतात व भात राकसवाडा जंगल परिसरात व गुहेच्या परिसरात ठेवला जातो.
काही वर्षांपूर्वी भुईबावडा येथील शिक्षक पी. एन. बगाडे आपल्या सहकाऱ्यांसोबत या परिसरात भटकंती करत गेले होते. त्यांच्या समोर एक साळींदर या गुहेत शिरला. बगाडे व सहकारी त्याच्यामागून आत शिरले तर तिथे त्यांना हा वाडा दिसला. त्यावेळी या वाड्याची मोठी चर्चा झाली, अनेकांची उत्सुकता वाढली. ऐनारीची ही गुहा प्रसिद्धीला आली. अनेक इतिहास संशोधकांनी याची पाहणी केली. त्यांच्या मते ही गुहा सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीची असावी, असा कयास आहे.
अशी आहे गुहा
या गुहेचे अंतगृह वैशिष्ट्यपूर्ण आहे. आत शयनगृह, पाण्याचे कुंड आहे. १२ खांबांचे सभागृह आहे. यातील सहा खांबांची पडझड झाली आहे. प्रत्येक खांब १२ ते १४ फूट उंचीचा व दाेन खांबांत १० फुटांचे अंतर आहे. गुहेपासून २० फुटांवर विहीर आहे, जी आता मुजली आहे.
बकासुराच्या वाड्याला कसे जावे..?
वेसरफ (ता. गगनबावडा) मार्गे चालत अनुभवी गिर्यारोहक व ट्रेकर्सच्या माध्यमातून रोपच्या साह्याने दरीतून जावे लागते. मुंबई-गोवा महामार्गावरून भुईबावडा घाटातून ४ किलोमीटरवर ऐनारी गाव आहे. या गावातून ऐनारी गुहेकडे १५०० मीटर उंचीवरील पायवाट बिकट आहे. पण गावकऱ्यांच्या मदतीने येथे जाता येते.