रस्त्यावरील जाहिरात बोर्ड काढण्याच्या कारणावरून बेकरी चालकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:24 AM2020-12-22T04:24:59+5:302020-12-22T04:24:59+5:30
नवे पारगाव : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील एसटी स्टँडसमोर असणाऱ्या बेकरी चालकाने रस्त्यावर लावलेले जाहिरात बोर्ड काढताना ...
नवे पारगाव : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील एसटी स्टँडसमोर असणाऱ्या बेकरी चालकाने रस्त्यावर लावलेले जाहिरात बोर्ड काढताना वडगाव पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी बेकरी चालकाच्या कुटुंबातील सहाजणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा वडगाव पोलिसांनी दाखल केला आहे. रविवार रात्री साडेनऊ वाजता घडलेल्या घटनेची सोमवारी वडगाव पोलिसात नोंद झाली आहे.
वडगावचे पोलीस कॉन्स्टेबल रणवीर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे; वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी आयपीएस पोलीस अधिकारी डॉ. बी. धीरजकुमार हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत कारवाईसाठी गेले होते. परत जात असताना वाठार स्टँड परिसरात तळसंदे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याचे आढळले. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर लावलेले बेकरी मालाच्या जाहिरातीचे बोर्ड काढण्यास प्रभारी आयपीएस अधिकारी डॉ. बी. धीरजकुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. यावेळी संशयित आरोपी दीपक भोपळे, गणेश भोपळे, गणेश भोपळे यांची पत्नी, दोन मुली व अन्य एक अनोळखी व्यक्ती यांनी सरकारी कामात अडथळा आणून फिर्यादी पोलीस कर्मचारी रणवीर जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली. आमचे बोर्ड काढले तर आम्ही आमच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करणार, अशी धमकी दिली. तो स्वतःचे डोके जमिनीवर आपटू लागला. त्यास बाजूला घेतले असता, त्याने आरडाओरडा केला. पालकमंत्री व एसपीकडे जाऊन तुम्हाला सोडणार नाही, तुमच्या नोकर्या घालवणार, आम्ही गळफास लावून आत्महत्या करणार, अशा धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नजीर खान करीत आहेत. संशयित आरोपी दीपक भोपळे याला पोलिसांनी अटक केली आहे.