बालगंधर्वांच्या रूपात सजली श्रीगणेशाची मूर्ती!

By admin | Published: September 11, 2015 09:12 PM2015-09-11T21:12:56+5:302015-09-12T00:10:41+5:30

कलावंतांनी साकारले वैविध्य : १९३६ मधील ‘लालबागच्या राजा’ची आठवण ताजी

Balagandharva as an idol of Shrigagana! | बालगंधर्वांच्या रूपात सजली श्रीगणेशाची मूर्ती!

बालगंधर्वांच्या रूपात सजली श्रीगणेशाची मूर्ती!

Next

सातारा : लाडक्या बाप्पांच्या आगमनाचे ढोल वाजू लागले आहेत. गौरी-गणपतीच्या सणाची तयारी घराघरात सुरू असून, बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. मूर्ती पसंत करण्यासाठी नागरिक सहकुटुंब स्टॉलवर हजेरी लावत आहेत. यावर्षी गणेशमूर्तींमध्ये वैविध्य आणि सुबकता अधिक दिसून येत आहे. यात बालगंधर्वांच्या रूपातील गणेशाचे रूपडे लक्ष वेधून घेत आहे. १९३६ मध्ये ‘लालबागचा राजा’ मंडळाने या रूपातील गणेशाची प्रतिष्ठापना केली होती.शहरातील दुकाने गौरी-गणपतीच्या स्वागतासाठी सजू लागली आहेत. पुढील आठवड्यात हे लाडके पाहुणे घरात येणार असल्याने घराची साफसफाई, रंगरंगोटी, सजावट सर्वत्र उत्साहाने केली जात आहे. बाप्पांची मूर्ती पसंत करणे हा विशेषत: घरातील लहानग्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आपली मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असावी, असा हट्ट धरून लहानगे पालकांकडे विशिष्ट मूर्तीची मागणी करताना दिसत आहेत. काही ठराविक साच्यातील, तर काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती विविध स्टॉलवर उपलब्ध आहेत.वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींमध्ये ‘बालगंधर्व’ रूपातील गणेश सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अत्यंत दिमाखदार वेशभूषेतील बालगंधर्वांच्या रूपातील ही मूर्ती १९३६ मध्ये मुंबईच्या प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ मंडळाने प्रतिष्ठापित केली होती. या आठवणी ताज्या करणारी ही मूर्ती नाट्यकलेची आवड असणाऱ्या प्रत्येकाला भुरळ पाडत आहे. याखेरीज विविध रूपांमधील गणेशमूर्ती उपलब्ध असून, त्यात चिंतामणीच्या रूपातील मूर्तीला विशेष मागणी आहे.शहराच्या मुख्य रस्त्यांवर विद्युत दिव्यांच्या झगमगाटात उभारलेल्या स्टॉल्सवर गेल्या वर्षीप्रमाणेच ‘जय मल्हार’ रूपातील मूर्तींचे दर्शन मोठ्या प्रमाणावर घडत आहे. अनेक ठिकाणी पौराणिक कथांवर आधारित गणेशमूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. फिलिप्स, शिर्वेकर, नागमूर्ती, सिंहासन, दगडूशेठ हलवाई अशी मूर्तींची विविध ‘मॉडेल्स’ लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे, बालगंधर्वांप्रमाणेच नाना पाटेकर रूपातील गणेशमूर्तीही पाहायला मिळत आहे. घरगुती मूर्तींच्या किमती १२५ ते तीन हजार रुपयांपर्यंत आहेत. (प्रतिनिधी)

शाडूच्या मूर्तींना मागणी
जलप्रदूषण होऊ नये म्हणून शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, यासाठी गेल्या वर्षी ‘लोकमत’ने विशेष मोहीम राबविली होती. विविध सेवाभावी संस्थांनी प्रबोधन केले. त्यामुळे निर्माण झालेले सामाजिक भान यंदाही दिसत असून, अनेकजण शाडूच्या मूर्तींची मागणी करीत आहेत. इकोफ्रेन्डली मूर्तींचे स्टॉलही ठिकठिकाणी उभारण्यात आले असून, तेथे पर्यावरणप्रेमी नागरिकांची गर्दी होत आहे.

Web Title: Balagandharva as an idol of Shrigagana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.