बालगोपाल, पाटाकडील साखळी फेरीत-फुलेवाडी, खंडोबा संघांचे आव्हान संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:38 AM2018-04-07T00:38:22+5:302018-04-07T00:38:22+5:30
कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा ३-१ असा, तर बालगोपाल तालीम मंडळाने खंडोबा
कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा ३-१ असा, तर बालगोपाल तालीम मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा टायब्रेकरवर ४-२ असा पराभव करीत साखळी फेरी गाठली.
शाहू स्टेडियमवर गुरुवारी (दि. ५) पावसामुळे थांबलेला पाटाकडील ‘अ’ व फुलेवाडी यांच्यातील सामना शुक्रवारी दुपारी झाला. प्रारंभापासून ‘पाटाकडील’ने वर्चस्व राखले. ५१व्या मिनिटाला ‘पाटाकडील’च्या हृषिकेश मेथे-पाटीलने ‘डी’ बाहेरून मारलेल्या फटक्यावर उत्कृष्ट गोल नोंदवीत संघाला १-० आघाडी मिळवून दिली. ‘फुलेवाडी’कडून सामन्यात बरोबरी साधण्यासाठी सूरज शिंगटे, नीलेश ढोबळे, निखिल जाधव, आदींनी जोरदार प्रयत्न केले. ६२व्या मिनिटाला नीलेश ढोबळेने गोल नोंदवीत सामन्यात फुलेवाडी संघाने १-१ अशी बरोबरी साधली. बरोबरीनंतर दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमक चढाया केल्या.
७४व्या मिनिटाला ‘पाटाकडील’कडून पुन्हा हृषिकेश-मेथे पाटीलने हेडद्वारे अप्रतिम गोल नोंदवीत सामन्यात संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यांनतर ८०व्या मिनिटाला ‘पाटाकडील’च्या ओबे अकीमने ‘फुलेवाडी’चा गोलरक्षक निखिल खाडे पुढे आल्याची संधी साधत गोल नोंदविला. पाटाकडील ‘अ’ने ३-१ असा सामना जिंकला.
दुसरा सामना बालगोपाल व खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झाला. ‘बालगोपाल’कडून सूरज जाधव, सचिन गायकवाड, प्रतीक पोवार, दिग्विजय वाडेकर, गोलस्की यांनी; तर ‘खंडोबा’कडून सागर पोवार, विक्रम शिंदे, प्रतीक सावंत, कपिल शिंदे यांनी चढाया केल्या. मात्र, अखेरपर्यंत दोन्ही संघास गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळे मुख्य पंच प्रदीप साळोखे यांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेण्याचा निर्णय घेतला. त्यात ४-२ ने बालगोपाल तालीम मंडळाने बाजी मारीत साखळी फेरी गाठली.
टायब्रेकर असा
‘बालगोपाल’कडून रोहित कुरणे, दिग्विजय वाडेकर, प्रतीक पोवार, प्रसाद सरनाईक यांनी गोल केला; तर सचिन गायकवाडचा फटका वाया गेला. ‘खंडोबा’कडून रणवीर जाधव, आशिष चव्हाण यांनी गोल केला; तर विक्रम शिंदे, ओंकार चौगले यांचे फटके वाया गेले.
‘बालगोपाल’चा गोलरक्षक निखिल खन्ना व ‘खंडोबा’चा गोलरक्षक रणवीर खालकर यांना सामन्यादरम्यान पंचांनी ‘डी’बाहेर येऊन चेंडू अडविल्याच्या कारणावरून रेड कार्ड दाखविले. अशा प्रकारे एकाच सामन्यात दोन्ही गोलरक्षकांना रेड कार्ड देण्याची घटना कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहासात प्रथमच घडली आहे, असे जाणकारांकडून सांगण्यात आले.