चित्रपट महोत्सवात बालचंदर, चौगुले यांना आदरांजली
By admin | Published: December 26, 2014 12:29 AM2014-12-26T00:29:25+5:302014-12-26T00:46:05+5:30
प्रामुख्याने तमिळ चित्रपट उद्योगासाठी काम करणाऱ्या बालचंदर यांचे हिंदीतही अनेक चित्रपट गाजले. ‘एक दुजे के लिए’ हे त्याचे उत्तम उदाहरण होय.
कोल्हापूर : तिसऱ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ दिग्दर्शक के. बालचंदर आणि बेळगाव फिल्म सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चौगुले यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट, सदस्य मनीष राजगोळकर, परीक्षक अशोक राणे, रफीक बगदादी, संस्कार देसाई उपस्थित होते. येथील शाहू स्मारक भवन परिसरात तिसरा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. या महोत्सवामध्ये बालचंदर आणि बेळगाव फिल्म सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चौगुले यांना आदरांजली वाहण्यात आली. आदरांजली वाहताना ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे म्हणाले, शंभराहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन बालचंदर यांनी केले. यामध्ये व्यावसायिक आणि समांतर चित्रपटांचाही समावेश होता. समांतर चित्रपटातून त्यांनी सामाजिक आशय आणि आशयघन विषयाची कास कधी सोडली नाही. प्रामुख्याने तमिळ चित्रपट उद्योगासाठी काम करणाऱ्या बालचंदर यांचे हिंदीतही अनेक चित्रपट गाजले. ‘एक दुजे के लिए’ हे त्याचे उत्तम उदाहरण होय. बालचंदर यांनी दिग्दर्शनासोबतच निर्मिती, लेखन, अभिनय, पटकथा लेखन, निवेदक याबरोबरीने विनोदी भूमिकाही पार पाडल्या. रामचंद्रन यांनी त्यांना पहिला ब्रेक दिला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांतून रजनीकांत, कमल हसन, चिरंजीवी, जयाप्रदा, प्रकाश राज या कलाकारांना पहिली संधी दिली, अशी माहिती राणे यांनी दिली.
बेळगावमध्ये १९८३ पासून फिल्म सोसायटीची स्थापना करून ती आजअखेर चालू ठेवण्याचे काम करणारे फिल्म क्लबचे कार्यकर्ते सुभाष बसाप्पा चौगुले यांनाही या महोत्सवात आदरांजली वाहण्यात आली. सुभाष चौगुले हे स्थापनेपासून बेळगावातील अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष होते. कर्नाटक चलचित्र अकादमीचेही ते सदस्य होते. त्यांच्यामुळेच बेळगावमध्ये फिल्म क्लबला चालना मिळाल्याचे कोल्हापूर चित्रपट महोत्सवाचे सचिव दिलीप बापट यांनी सांगितले.
महोत्सवात काही सेकंद मौन पाळून चित्रपटगृहातील रसिकांनी बालचंदर तसेच सुभाष चौगुले यांना आदरांजली वाहली. (प्रतिनिधी)
परीक्षकांचा सन्मान
महोत्सवात माय मराठी विभागात दाखविण्यात येणाऱ्या उत्कृष्ट चित्रपटांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. या चित्रपटांचे परीक्षण करणाऱ्या अशोक राणे, रफीक बगदादी आणि संस्कार देसाई या तिघांचा या महोत्सवामध्ये अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.